आजपासून जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:39 AM2021-09-02T04:39:28+5:302021-09-02T04:39:28+5:30

नांदेड : कुपोषणमुक्त भारत या संकल्पनेवर आधारित शासनाच्या विविध विभागांमध्ये अभिसरण पद्धतीने पोषण अभियान कार्यक्रम देशपातळीवर राबविण्यात येत आहे. ...

National Nutrition Month in the district from today | आजपासून जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महिना

आजपासून जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महिना

Next

नांदेड : कुपोषणमुक्त भारत या संकल्पनेवर आधारित शासनाच्या विविध विभागांमध्ये अभिसरण पद्धतीने पोषण अभियान कार्यक्रम देशपातळीवर राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सप्टेंबर २०२१ हा चौथा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून जिल्ह्यात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली.

राष्ट्रीय पोषण महिन्यात महिला व बाल विकास विभाग नोडल विभाग म्हणून काम करणार आहे. राष्ट्रीय पोषण महिन्यामधील सर्व विभागांमध्ये समन्वय अभिसरण राखण्याच्या दृष्टीने महिला व बालकल्याण विभागाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पहिल्या आठवड्यात गावस्तरावर पोषण अभियानाचा शुभारंभ अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी आदींच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे. अंगणवाडी केंद्र, शाळा, ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच इतर सार्वजनिक जागांवर वृक्षारोपण करून पोषण वाटिका तयार करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत परसबाग तयार करणे, अंगणवाडी परिसरामध्ये पोषण वाटिकेबाबत जनजागृती आणि प्रचार-प्रसिद्धी करणे, गर्भवती महिलांसाठी पोषक आहाराबाबत घोषवाक्य तयार करून स्पर्धा आयोजित करणे, अंगणवाडी केंद्रासाठी पोषण वाटिका स्पर्धा आयोजित करणे, कोविड लसीकरणाबाबत जनजागृती करून कार्यक्रम घेणे, मातृवंदना सप्ताह एकत्रितपणे साजरा करणे.

दुसऱ्या आठवड्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे १०० टक्के कोविड लसीकरण करणे, गर्भवती महिला व स्तनदा मातांसाठी कोविड लसीकरण शिबिर राबविणे, ॲनिमियामुक्त भारताच्या अनुषंगाने गर्भवती महिलांसाठी ॲनिमिया तपासणी, उपचार आणि समुपदेशन करणे, गर्भवती महिलांसाठी गृहभेटीच्या माध्यमातून पोषण आहाराबद्दल, लोह व फॉलिक ॲसिडच्या सेवनाबद्दल समुपदेशन करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. तिसऱ्या आठवड्यात तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी ऑनलाईन पूर्व शालेय शिक्षणाच्या कृतीचे आयोजन, १०० टक्के लाभार्थ्यांचे तरंग सुपोषित महाराष्ट्र या पोर्टलवर रजिस्ट्रेशन आणि जनजागृती, सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोग्य व पोषणविषयक ऑनलाईन शिबिरे व जनजागृती, अंगणवाडी लाभार्थ्यांना स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पोषणविषयक साधनसामग्रीचे वाटप करणे, आरोग्य व कुटुंबकल्याण तसेच आयुष विभागाच्या प्रचार प्रसिद्धीचे साहित्य वाटप करणे, चौथ्या आठवड्यात तीव्र कुपोषित मुलांना शोधून पोषण आहाराचे वाटप करणे, प्रकल्पनिहाय तीव्र कुपोषित मुलांची शोधमोहीम आणि संदर्भ सेवा देणे, वस्ती स्तरावरील तीव्र कुपोषित मुले शोधण्याबद्दल जनजागृती करणे, गर्भवती महिलांसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा, मुलांमधील कुपोषण या विषयावर ऑनलाइन प्रश्नमंजूषा स्पर्धा, ‘माझे मूल माझी जबाबदारी’च्या अनुषंगाने कोविडसदृश लक्षणे असलेल्या मुलांची तपासणी आणि उपचार करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

१ सप्टेंबरपासून या राष्ट्रीय पोषण महिन्याला सुरुवात होणार आहे. यासाठी आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, महिला व गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून राष्ट्रीय पोषण महिना साजरा करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती सुशीलाताई पाटील बेटमोगरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम यांनी केले आहे.

Web Title: National Nutrition Month in the district from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.