नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना रखडली; ८८ पैकी केवळ 4 योजनांमधून प्रत्यक्ष पाणी पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 06:24 PM2018-01-01T18:24:08+5:302018-01-01T18:25:15+5:30
जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत २०१७-१८ च्या कृती आराखड्यानुसार मंजूर झालेल्या ८८ पैकी ३० योजनांची कामे समितीचा वाद, कंत्राटदाराकडून मिळत नसलेला प्रतिसाद आदी कारणांमुळे रखडली आहेत़
- श्रीनिवास भोसले
नांदेड : जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत २०१७-१८ च्या कृती आराखड्यानुसार मंजूर झालेल्या ८८ पैकी ३० योजनांची कामे समितीचा वाद, कंत्राटदाराकडून मिळत नसलेला प्रतिसाद आदी कारणांमुळे रखडली आहेत़ त्यामुळे अनेक गाव, वस्ती, तांड्यांवर योजना मंजूर होवूनदेखील तेथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, असे चित्र आहे़
ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने शासनाकडून गाव, वाडी, वस्त्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना अशा विविध योजना राबवित आहे़ सदर योजनांच्या प्रस्तावास शासनस्तरावरून चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु अशुद्ध अन् फ्लोराईडमिश्रिम पाणी, पाण्याचे स्त्रोत नसणे, ग्रामपंचायतीचा वाद, कंत्राटदरांचा कामचुकारपणा, जागेचा वाद यासह काही अधिकार्यांच्या उदासीनतेमुळे अनेक योजनांची कामे रखडली आहेत़ तर काही योजना पूर्ण होवूनदेखील प्रत्यक्षात पाणीपुरवठा झालेला नाही़ त्यामुळे सदर योजना ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी स्थिती झाली आहे़
जिल्ह्यातील ८८ पैकी आजपर्यंत केवळ चार योजनांतून प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरू केल्याची नोंद जिल्हा परिषदेत आहे़ यामध्ये भोकर तालुक्यातील बल्लाळ तांडा, बल्लाळ, कंधारमधील गांधीनगर, हरबळ गावांचा समावेश आहे़
दरम्यान, शासनाकडून मंजूर असूनही पाणीपुरवठा समितीचा वाद, कंत्राटदारांची दिरंगाई, वीजपुरवठा, पाटबंधारे विभागाची हरकत आदी कारणांमुळे ३० योजना रखडल्या आहेत़ यामध्ये बिलोली तालुक्यातील हुनगुंदा, देगलूर-लिंगनकेरूर, धर्माबाद - बाचेगाव, हदगाव-चोरंबा, तरोडा व विठ्ठलवाडी, कंधार-गगनबीड, पांडवदरा, लालवाडी, देवला तांडा, राऊत खेडा, शिरशी खु़, किनवट तालुक्यातील चिंचोली तांडा, झेंडीगुडा, बेगमबाई तांडा, लोहा-शेवडी (बाजीराव), जोशी सांगवी, सुगाव, माहूर- अंजनी, मुदखेड-दरेगाव तांडा, मुखेड - बेरली, बोरगाव, लोणाळ, मोटरगा, मेथी, सांगवी बेनक व तांडा, नायगाव- नरशी, नरशी तांडा, पळसगाव, नांदेड- विष्णुपूरी, वाडी पूयड, वानेगाव, वारखेड, भानपूर आदींचा समावेश आहे़ माहूर, उमरी, किनवट, कंधार तालुक्यातील अनेक जुन्या योजना आज बंद आहेत़ पाण्याचे स्त्रोत बंद, थकित वीजबिल, हस्तांतरण आदी कारणाने बंद असल्याने तेथे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे़ याठिकाणी पर्यायी पाणीपुरवठा योजना राबविणे गरजेचे आहे़
प्रगतीपथावरील योजना
अनेक योजनांची विहीर पूर्ण झाली, पंपगृह पूर्ण, नवीन जागेची निश्चिती करून काम सुरू केलेल्या तसेच शेवटच्या टप्प्यात प्रगतीपथावर असणार्या योजना पुढीलप्रमाणे - भोकर तालुक्यातील बल्लाळ तांडा, धावरी, बिलोली-सावळी, देगलूर- काथेवाडी, कुतुब शहापूरवाडी, देगलूर- लोणी, मरखेल, धर्माबाद - बामणी, नायगाव ध, पांगरी, हदगाव- लोहा तांडा, शिऊर, हिमायतनगर- भोंदनी तांडा, दाबदरी, वाळकेवाडी, कामारी, टेंभूर्णी, कंधार-बोरी खु, धानोरा कौठा, मुंढे वाडी, शेकापूर, तळ्यांची वाडी, किनवट- रोडा नाईक तांडा, चितळी, धनज, जोमेगाव यासह लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, उमरी तालुक्यातील काही योजनांचा समावेश आहे़
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनांचीही प्रतीक्षाच
ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही़ शासनाकडून खास ग्रामीण भागासाठी राबविण्यात येणार्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मंजूर योजनांची कामेदेखील या ना त्या कारणाने अडकलेली आहेत़ दुसर्या टप्प्यात प्रस्तावित असणार्या ३८ पैकी ६ योजना तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे़ तर ११ योजनांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर आहेत़