नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:49 AM2018-04-23T00:49:43+5:302018-04-23T00:49:43+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने या निवडीच लांबणीवर टाकण्याचा निर्णय पक्ष निरीक्षक आ. सतीश चव्हाण यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवड आता वरिष्ठच करतील, असे सांगत चव्हाण यांनी दोन्ही पदांच्या निवडीच्या बैठका गुंडाळल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने या निवडीच लांबणीवर टाकण्याचा निर्णय पक्ष निरीक्षक आ. सतीश चव्हाण यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवड आता वरिष्ठच करतील, असे सांगत चव्हाण यांनी दोन्ही पदांच्या निवडीच्या बैठका गुंडाळल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०१८ ते २०२० या कालावधीत संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. २२ एप्रिल रोजी नांदेडमध्ये या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आ. सतीश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. सुनील कदम यांच्या निवासस्थानी असलेल्या पक्ष कार्यालयात शहर जिल्हाध्यक्षपदासाठी बैठक झाली. या बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम हे पुन्हा इच्छुक आहेत. त्याचवेळी पक्षाचे कार्याध्यक्ष जीवन घोगरे यांनीही या पदावर दावा केला. इच्छुकांची संख्या वाढल्याने सदर निर्णय घेण्याचे अधिकार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम यांना देण्यात येत असलेला ठराव शहर कार्यकारिणीने घेतला. जीवन घोगरे पाटील हे या ठरावाचे सुचक आहेत तर रामनारायण बंग यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे शहर जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय आता वरिष्ठ पातळीवरच होईल, हे स्पष्ट करण्यात आले.
राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठीही तीन नावे पुढे आली आहेत. त्यामध्ये विद्यमान जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांना पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदाची आशा आहे तर त्याचवेळी यापूर्वी जिल्हाध्यक्ष राहिलेले दत्ता पवार यांनीही आता यावेळी हे पद आपल्याला देण्याची मागणी केली. हरिहरराव भोसीकर यांचेही नाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी चर्चेत आले. परिणामी इच्छुकांची ही वाढती संख्या पाहता निवडणूक निर्णय अधिकारी आ. सतीश चव्हाण यांना दोन्ही पदाच्या निवडी घोषित करणे सोपे नव्हते. परिणामी चव्हाण यांनी सदर निवड प्रक्रियाही पुढे ढकलल्याचे स्पष्ट केले.
जिल्ह्यातील वरिष्ठ नेते कमलकिशोर कदम आणि प्रदेश पातळीवरील नेते याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे सांगत त्यांनी दोन्ही बैठका गुंडाळल्या. विशेष म्हणजे, एकाच पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीच्या बैठका वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दोन्ही पदे महत्त्वाची मानली जातात. निवडणूक काळातील आपले महत्त्व कायम राहावे, यासाठी विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष पुन्हा हे पद आपल्याकडेच रहावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीत पक्षाची झालेली धूळधाण पाहता नवे चेहरे शहर जिल्हाध्यक्षपदी द्यावेत, अशी मागणी होत आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनाही आता पदासाठी स्पर्धेला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आता प्रदेश पातळीवरुन जुन्यांना संधी मिळते की नवे चेहरे दिले जातात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आठवडाभरात निवड प्रक्रिया
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटतटांची मोठी संख्या आहे. त्यातही रविवारी झालेल्या निवड प्रक्रियेत किनवटचा गट अलिप्तच राहिला. गोरठेकर समर्थकांची मोठी उपस्थिती होती. तसेच शंकर अण्णा धोंडगे यांचाही गट दत्ता पवार यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद द्यावे, यासाठी आग्रही होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निवडीसंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी चव्हाण यांनी सांगितले, इच्छुकांची संख्या निश्चितच वाढली आहे. परिणामी हा निर्णय आता स्थानिक स्तरावर घेणे शक्य नाही. प्रदेश पातळीवरच आठवडाभरात या दोन्हीही निवडी होतील, असे आ. चव्हाण म्हणाले.