‘एनसीबी’च्या धाडींनी नांदेड जिल्हा पाेलीस दलाच्या कर्तव्य दक्षतेवरच प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 08:02 PM2021-11-26T20:02:24+5:302021-11-26T20:04:48+5:30
NCB Raids In Nanded : एनसीबीच्या दाेन धडक कारवायांनी जिल्हा पाेलिसांच्या एकूणच कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
नांदेड : एनसीबीने (NCB ) आठवडाभरात पाठोपाठ दोन धाडी जिल्ह्यात यशस्वी केल्याने स्थानिक पोलिसांच्या एकूणच कर्तव्य दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या कारवाईने नांदेड हे अंमली पदार्थांची तस्करी, साठा, वाहतूक व वापराचे प्रमुख केंद्र बनत अल्स्याचे समोर आले आहे. ( NCB Raids In Nanded, Question Marks On Police )
एनसीबीच्या मुंबईतील पथकाने सतत पाळत ठेवून आंध्र प्रदेशातून नांदेडमार्गे खान्देशात जाणारी काेट्यवधी रुपयांच्या गांजाची खेप पकडली. थेट वरच्या स्तरावरून झालेल्या या कारवाईने स्थानिक पाेलीस प्रशासन अस्वस्थ असतानाच एनसीबीने जिल्हा पाेलिसांना नुकताच दुसरा धक्का दिला. येथून डाेडा हे अंमली पदार्थ जप्त केले गेले. त्याचा कारखाना उद्ध्वस्त केल्याचे एनसीबीने म्हटले आहे. एनसीबीच्या या दाेनही धडक कारवायांनी जिल्हा पाेलिसांच्या एकूणच कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. एनसीबीची चमू आठवडाभर पाळत ठेवून व मुंबईहून भल्या पहाटे नांदेड जिल्ह्यात येऊन १ हजार १२७ किलाे गांजाची खेप पकडते आणि स्थानिक पाेलिसांना याबाबत पुसटशी कल्पनाही नसावी, हे एक कोडेच आहे. खुद्द एनसीबीनेही याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे.
एनसीबीच्या कारवाईने नांदेड शहरच नव्हे तर, ग्रामीण क्षेत्रसुद्धा अंमली पदार्थाच्या तस्करी व साठ्याचे शिवाय कच्चा माल आणून अंमली पदार्थाच्या निर्मितीचे केंद्र बनल्याचे अधाेरेखित झाले आहे. जिल्ह्याला तेलंगाणा-आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांची सीमा लागून आहे. या सीमावर्ती भागातूनच अंमली पदार्थ, प्रतिबंधित गुटखा, सुपारी माेठ्या प्रमाणात नांदेडमध्ये आणली जाते. याच मार्गाने ती इतर राज्यात व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात पाेहाेचविली जाते. एवढे सगळे हाेत असताना पाेलिसांकडून मात्र गांजाची छुटपूट केस करून रेकाॅर्डवर ‘कामगिरी’ दाखविली जाते. एनसीबीच्या कारवाईने अशा कामगिरीसाठी नांदेड शहर व जिल्ह्यात पाेलिसांना प्रचंड वाव असल्याचे स्पष्ट हाेते. एनसीबीने पाठाेपाठ दाेन ठिकाणी टाकलेल्या धाडींनी जिल्हा पाेलिसांचे अपयश उघड केले आहे. किमान आतातरी जिल्हा पाेलीस अंमली पदार्थाची तस्करी राेखण्यासाठी स्थानिक पातळीवर माेहीम उघडतील काय?, याकडे लक्ष लागले आहे.
नांदेड दंगलीने ‘उद्ध्वस्त नेटवर्क’चा मुद्दा ऐरणीवर
नांदेडमध्ये अचानक दंगल उसळली. पाेलिसांवर दगडफेक करण्यात आली. ही घटना पाहता पाेलीस कमालीचे बेसावध असल्याचे दिसून आले. या घटनेने इंटेलिजन्स ब्युराे (आयबी), राज्य गुप्तवार्ता विभाग (एसआयडी), जिल्हा विशेष शाखा (डीएसबी) आणि पाेलीस ठाण्यांची खुफिया यंत्रणा या सर्वांचेच खबऱ्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येते. मात्र उच्चपदस्थ पाेलीस प्रशासन पाेलिसांचे हे अपयश मानण्यास तयार नाहीत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्तचर यंत्रणेला १०० टक्के खरीच माहिती मिळेल हे सांगणे कठीण आहे. या दंगलीनंतर दाेन दिवसांनी (१६ नाेव्हेंबर दरम्यान) पुन्हा दगडफेक हाेईल असा अंदाज प्रमुख गुप्तचरांनी अप्पर पाेलीस महासंचालक संजीवकुमार यांच्यापुढे वर्तविला हाेता. मात्र प्रत्यक्षात ही दगडफेक झाली नाही. यावरून गुप्तचरांचा अंदाज खोटा ठरल्याचे स्पष्ट होते.
दंगल वेळीच राेखण्यात पाेलीस यशस्वी
अचानक व अनपेक्षितरित्या जमाव रस्त्यावर उतरल्याने दगडफेक व तणावाची स्थिती निर्माण झाली असली तरी ती नियंत्रित करण्यात व दंगल आणखी पसरू न देण्यात जिल्हा पाेलीस यशस्वी झाल्याचे उच्चपदस्थ पाेलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न एक दिवस निर्माण झाला व त्याचदिवशी संपला. ताे शहराच्या इतर भागात पसरू न देणे हीच पाेलिसांची खास कामगिरी राहिली. अन्य जिल्ह्यात मात्र हाच तणाव अनेक दिवस कायम राहून संचारबंदी लावण्याची वेळ आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. दंगल उसळलेल्या इतर जिल्ह्यांचा विचार केल्यास नांदेड जिल्हा पाेलिसांची कामगिरी घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात सरस ठरल्याचे प्रमाणपत्रही या अधिकाऱ्याने दिले.