तर भिंगे यांच्या रुपाने राष्ट्रवादीला आमदारकी; नांदेड जिल्ह्याला तेराव्या आमदाराची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 07:34 PM2020-11-07T19:34:03+5:302020-11-07T19:35:44+5:30
काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढविलेल्या प्राध्यापक यशपाल भिंगे यांची साहित्यिक म्हणून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी शिफारस केल्याची चर्चा आहे.
नांदेड : राज्यपाल नियुक्त बारा जागांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून १२ जणांची नावे बंद लिफाफ्यात राज्यपालांकडे शुक्रवारी सुपूर्द करण्यात आली. यामध्ये नांदेड येथील प्रा. यशपाल भिंगे यांचेही नाव असल्याची चर्चा असल्याने भिंगे यांना आमदारकीची लॉटरी लागल्यास राष्ट्रवादीलाही जिल्ह्यात एकमेव आमदार लाभणार आहे. दुसरीकडे त्यांच्या रुपाने जिल्ह्याला तेरावा आमदार मिळेल.
काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढविलेल्या प्राध्यापक यशपाल भिंगे यांची साहित्यिक म्हणून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी शिफारस केल्याची चर्चा आहे. पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले यशपाल भिंगे पंढरपूर येथे ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्ता संपादन मेळाव्यापासून चर्चेत आले होते. आंबेडकर यांनी निवडणुकीच्या सहा महिने अगोदारच वंचितकडून राज्यातील पहिला उमेदवार म्हणून माळेगाव येथील मेळाव्यात भिंगे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. या त्यांनी निवडणुकीत १ लाख ६६ हजारांहून अधिक मते मिळविली. या मतविभागणीमुळेच काँग्रेस नेते चव्हाण यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते.
मागील काही दिवसांपासून भिंगे यांचा बायोडाटा राष्ट्रवादीने मागविल्याची चर्चा होती. त्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्राध्यापक यशपाल भिंगे यांच्या नावाला विरोध केला होता. काहींनी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तशी पत्रेही पाठविली. मात्र त्यानंतरही भिंगे यांना पक्षाने प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.