हे खुनी सरकार, मूल गमावलं त्या आईला काय उत्तर देणार?; नांदेड मृत्यूसत्रावरून सुप्रिया सुळे संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 10:53 AM2023-10-03T10:53:18+5:302023-10-03T11:10:25+5:30

नांदेड रुग्णालयातील घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

NCP leader Supriya Sule has criticized the state government over the incident in Nanded hospital. | हे खुनी सरकार, मूल गमावलं त्या आईला काय उत्तर देणार?; नांदेड मृत्यूसत्रावरून सुप्रिया सुळे संतप्त

हे खुनी सरकार, मूल गमावलं त्या आईला काय उत्तर देणार?; नांदेड मृत्यूसत्रावरून सुप्रिया सुळे संतप्त

googlenewsNext

नांदेडमधील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे आणखी ४ नवजातांसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मागील ४८ तासात एकूण मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता ३१ झाली आहे.  यात ४ नवजात बालक, ३ प्रौढ यांचा समावेश आहे. त्या अगोदरच्या २४ तासात २४ जणाचा मृत्यू झाल्याने अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. आता एकूण मृत्यूंची संख्या आता ३१ वर पोहोचली आहे.

नांदेडमधील या धक्कादायक घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत हे सरकार अतिशय असंवेदनशील असल्याची टीका केली आहे. राज्यातील तीन इंजिनचं शिंदे सरकार, हे खुनी सरकार आहे, असा माझा आरोप आहे. ज्या आईन आपलं बाळ गमावलं आहे, त्या आईला सरकारने विचारावं, तिचं दुःख काय आहे. त्यांच्या आईला काय उत्तर देणार? असा सवाल उपस्थित करत संबंधित मंत्र्याचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा बळी नसून खून आहे, असा आरोपही सुप्रिया सुळेंनी केला आहे. 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील आज ट्विट करत राज्य सरकारचा समाचार घेतला आहे. नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे 'औषध पुरवून वापरा' असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय?, दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे, अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं, असं म्हणत राज ठाकरेंनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

चौकशी समिती आज नांदेडमध्ये-

सदर घडलेल्या प्रकारानंतर चौकशी समिती आज नांदेडमध्ये येणार आहे. शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील डॉ. भारत चव्हाण, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. जोशी या तिघांची चौकशी समिती नांदेडात येणार आहे.

Web Title: NCP leader Supriya Sule has criticized the state government over the incident in Nanded hospital.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.