किनवट तालुक्यात जवळपास १२ हजार अर्ज नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:20 AM2018-02-08T00:20:53+5:302018-02-08T00:21:19+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत अर्ज दाखल केलेल्या २३ हजार २०० पैकी तब्बल ११ हजार ९८५ शेतक-यांचे अर्ज विविध त्रुटींमुळे नाकारण्यात आले. यादीतील नावे पाहण्यासाठी शेतक-यांनी बँकेसमोर मोठी गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत अर्ज दाखल केलेल्या २३ हजार २०० पैकी तब्बल ११ हजार ९८५ शेतक-यांचे अर्ज विविध त्रुटींमुळे नाकारण्यात आले. यादीतील नावे पाहण्यासाठी शेतक-यांनी बँकेसमोर मोठी गर्दी केली होती.
यादी इंग्रजीत असल्याने अनेकांना नावे वाचणे कठीण जात आहे. आधार क्रमांक चुकीचा, बँक खाते एकाचे, कर्ज प्रकरणासाठी अर्ज आॅनलाईन दुस-याचा, नाव चुकलेले, बँक आणि आॅनलाईनमध्ये तफावत, मयत वडिलाच्या नावे कर्ज आॅनलाईन कर्ज प्रकरण, मुलाच्या नावे आदींमुळे बहुतांश शेतक-यांची नावे यादीतून वगळण्यात आली.
दरम्यान, शेतक-यांना नानाविध कारणांनी त्रुटीत अडकवून त्यांची फजिती करण्यात आल्याचा आरोप आ. प्रदीप नाईक यांनी केला.
यादीत नाव न आलेल्या शेतक-यांची धावपळ
निवघा बाजार : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज भरलेल्या अनेक शेतक-यांचे अर्ज नाकारण्यात आले, असे शेतकरी आता त्रुटींची पूर्तता करण्यात व्यस्त आहेत.चार दिवसांपूर्वी बँकांनी त्रुटीच्या याद्या डकवल्या त्यात नाव पाहण्यासाठी शेतक-यांनी गर्दी केली होती. तसेच त्रुटींची पूर्तता करण्यासाठी धावपळ केली. ज्यांची नावे त्रुटीत नाहीत अशांच्या चेह-यांवर मात्र समाधान दिसत आहे.
याद्याच्या दुरुस्तीसाठी सहाय्यक निबंधक, लेखा परीक्षक व बँकेचे अधिकारी यांची समिती आहे. त्रुटींची पूर्तता केल्यानंंतर बँकेने अपलोड केलेला डाटा आॅनलाईन समितीकडे येणार आहे. समितीकडून अर्जांची तपासणी करण्यात येणार आहे. शेतक-यांनी त्रुटींच्या पूर्ततेसाठी बँकेशी संपर्क साधावा- पी. जी. पपूलवार, सहाय्यक निबंधक, किनवट