मराठा आरक्षण प्रकरणात केंद्राने लक्ष देण्याची गरज -चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:17 AM2021-02-15T04:17:11+5:302021-02-15T04:17:11+5:30

नांदेड : मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले पाहिजे. यासाठी देशातील उत्तमातील उत्तम वकिलांची टीम राज्य शासनाने ...

The need for the Center to pay attention to the Maratha reservation issue - Chavan | मराठा आरक्षण प्रकरणात केंद्राने लक्ष देण्याची गरज -चव्हाण

मराठा आरक्षण प्रकरणात केंद्राने लक्ष देण्याची गरज -चव्हाण

Next

नांदेड : मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले पाहिजे. यासाठी देशातील उत्तमातील उत्तम वकिलांची टीम राज्य शासनाने उभी केली आहे. समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी आपण मनातून प्रयत्न करत आहोत; परंतु आता ही लढाई जिंकण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय अ‍ॅटर्नी जनरलने केंद्राची भूमिका मांडली पाहिजे. या प्रकरणात पंतप्रधानाच्या माध्यमातून केंद्राने लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले. मराठा वधू-वर सुचक मंडळाच्या 17 व्या मराठा वधू-वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी उपसमितीचा अध्यक्ष या नात्याने मी प्रामाणिकपणे मराठा समाजाची बाजू नामवंत वकिलाच्या माध्यमातून सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात मांडतो आहे. राज्यासह देशातील नामवंत विधिज्ञ सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आता केंद्रीय पातळीवर देखील प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वपक्षीय खासदारांनी प्रधानमंत्री याच्यांकडे मराठा आरक्षणाच्या अनुकूल बाजूने न्यायालयात आपली भूमिका मांडण्यासाठी केंद्रातील अ‍ॅटर्नी जनरल यांच्याकडे पाठपुरावा करण्याची भूमिका घेतली पाहिजे. इतर राज्याला वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला मात्र वेगळा न्याय असे होता कामा नये, असेही ते म्हणाले. मराठा समाजाच्या विकासासाठी ज्या इतर बाबी आहेत, यावरही मी लक्ष केंद्रित केले आहे. मराठा समाजाचे प्रश्न मी प्रामाणिकपणे यथाशक्ती सोडण्याचा प्रयत्नही करेल, असेही अभिवचन त्यांनी याप्रसंगी दिले.

वधू-वर सुचक मेळाव्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, मराठा वधू-वर परिचय मेळावा घेणे काळाची गरज असून यातून समाजाला फार मोठी मदत होते. ग्रामीण भागात राहणारा मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्यासाठी वधू-वर परिचय मेळावा घेणे गरजेचे आहे. यासोबतच समाजाने उद्योग शिबिरे घेऊन तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. व्यवसायात सुद्धा या समाजाने पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहनअण्णा हंबर्डे, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅडव्होकेट बी.आर. भोसले, सौ. संध्याताई कल्याणकर, नरेंद्र चव्हाण, आनंद चव्हाण, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कामाजीराव पवार, डॉ. गणेश शिंदे, मंडळाचे अध्यक्ष चंद्रभान पाटील जवळेकर, कार्याध्यक्ष संभाजीराव शिंदे, विठ्ठल पाटील, सौ. संगीता पाटील, डॉ. रेखा चव्हाण, कल्पना डोंगळीकर, शिवाजी खुडे, डॉ. गणेश शिंदे, प्रा. संतोष देवराये, तानजी हुस्सेकर, डॉ. विठ्ठल पावडे, मुन्ना कदम, रवी पाटील ढगे, अ‍ॅड. एल.जी. पुयड, प्रा. प्रेम कौशल्ये आदी उपस्थित होते.

या प्रसंगी आ. मोहनअण्णा हंबर्डे, कामाजी पवार, प्रा. गणेश शिंदे, नरेंद्र चव्हाण, आनंद चव्हाण, संध्याताई कल्याणकर आदींची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वधू-वर सुचक मंडळाचे सचिव प्रा. संतोष देवराये व दिगंबर कदम यांनी केले. तर उपस्थितांचे आभार इंजि. तानाजी हुस्सेकर यांनी मानले. वधू-वर परिचय मेळाव्यासाठी नांदेड शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक नियोजित वधू-वर व पालक यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात 480 नियोजित वधू-वरांची नोंदणी झाली.

Web Title: The need for the Center to pay attention to the Maratha reservation issue - Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.