वंचितांच्या विकासाच्या शैक्षणिक धोरणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:22 AM2021-06-09T04:22:47+5:302021-06-09T04:22:47+5:30
नांदेड : विकासाच्या सर्व वाटा शिक्षणातूनच उद्भवतात. पण कोरोनामुळे विकासाचे इंजिन असलेले शिक्षणच थांबले आहे. खेड्यांच्या गरजा समोर ठेवून ...
नांदेड : विकासाच्या सर्व वाटा शिक्षणातूनच उद्भवतात. पण कोरोनामुळे विकासाचे इंजिन असलेले शिक्षणच थांबले आहे. खेड्यांच्या गरजा समोर ठेवून वंचितांच्या विकासाचे शैक्षणिक धोरण राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी कुलगुरू व माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांनी मराठवाडा जनता विकास परिषद व राज्यशास्त्र विभाग, पीपल्स कॉलेज, नांदेडतर्फे कोरोना काळातील मराठवाड्याच्या विकासाची स्थिती या विषयावर ६ व ७ रोजी आयोजित ऑनलाईन वेबीनारच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे होते. मजविपचे सचिव प्राचार्य जीवन देसाई यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. आर.एम. जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मराठवाड्यातील उद्योगाची स्थिती या विषयावर बोलताना प्रसिद्ध उद्योजक व मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य मुकुंद कुलकर्णी म्हणाले, कोरोनाने प्रतिकूलतेची परिस्थिती निर्माण झाली हे खरे असले तरी उद्योजकीय मानसिकता असणार्यांसाठी हा काळ पूरकच आहे. कोरोनाला पराभूत करण्यासाठी शासकीय व प्रशासकीय आणि नागरी शिस्तीची गरज आहे.
मराठवाड्याच्या विकासासाठी विभागवार अनुशेष न काढता जिल्हा हा घटक गृहित धरून अनुशेष काढल्याने मराठवाड्याच्या विकासावर फार मोठा अन्याय झाला आहे. त्यासाठी मराठवाड्याच्या लोकप्रतिनिधींनी व जनतेने सांघिकपणे लढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी कार्यकारी संचालक व इंजि. शंकरराव नागरे यांनी केले.
मजविप व पीपल्स कॉलेजतर्फे आयोजित ऑनलाईन चर्चासत्रात बोलतांना कोरोना काळातील मराठवाड्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण या विषयावर माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे म्हणाले, कोरोना काळात ग्रामीण भागातील शिक्षणाची स्थिती चिंताजनक बनली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी ब्रीज कोर्स सुरू करावा लागेल. मराठवाड्यातील विविध केंद्रातून कार्यरत असलेल्या केंद्र प्रमुख व शिक्षकांना प्रशिक्षण व कार्य करण्याची प्रेरणा दिली पाहिजे. मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्याची आजही गरज असून गाव विकासाचे एकमेव परिमाण शाळा हेच आहे. यावेळी बोलतांना मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. अशोक बेलखोडे म्हणाले, कोरोनाकाळात मराठवाड्यात सर्वाधिक मृत्यू झाले. कारण महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात आरोग्य क्षेत्रात भौतिक सुविधांबाबत आपण कुपोषितच आहोत. ग्रामीण व आदिवासी भागात आजही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत. मराठवाड्यात मल्टीस्पेशालिटी सेवा उपलब्ध असलेले एकही अद्ययावत सेंटर नाही. पुरेसे कर्मचारी नाहीत. म्हणून यापुढे मराठवाड्याच्या आरोग्य सुविधांसाठी विशेष अनुदान देऊन भौतिक सुधारणांची गरज आहे.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. काब्दे म्हणाले, या ऑनलाईन चर्चासत्राच्या माध्यमातून कोरोना काळातील मराठवाड्याच्या विकासाची स्थिती या विषयावर तज्ज्ञ व्यक्तींनी मांडलेल्या चिंतनातील महत्त्वाचे विकास विषयक मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी यापुढे मराठवाड्यातील आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊ. तसेच तज्ज्ञांचे सल्ले घेऊन न्यायालयीन लढे उभारू व मराठवाड्याच्या विकासासाठी लोकलढा उभारावा लागेल. तरच मराठवाड्याला न्याय मिळेल. त्यासाठी यापुढे मजविप पुढाकार घेऊन कार्य करेल असा विश्वास व्यक्त केला.
ऑनलाईन वेबीनारमध्ये माजी आमदार डी. के. देशमुख, माजी आमदार पंडितराव देशमुख, माजी प्राचार्य डॉ. व्ही. एन. इंगोले, इंजि. या. रा. जाधव, अॅड. विजय देशमुख, प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव, डॉ. विकास सुकाळे, डॉ. डी. एन. मोरे, प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, प्रा. डी. पी. डिगोळे, प्रा. डॉ. मथू सावंत, प्रा. डॉ. मनीषा गहिलोत, प्रा. अमोल काळे, राहुल गवारे इत्यादींसह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
या दोन दिवशी ऑनलाईन वेबीनार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मजविपचे सहसचिव व संयोजक डॉ. अशोक सिध्देवाड यांनी केले तर आभार डॉ. अभय दातार व डॉ. बालाजी कोम्पलवार यांनी मानले.