विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणे काळाची गरज - राज्यपाल चे. विद्यासागर राव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 07:33 PM2019-06-03T19:33:39+5:302019-06-03T19:35:50+5:30
३ जून ते १२ जून या कालावधीत होणार राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर
नांदेड : सध्याच्या काळात प्रत्येक राष्ट्राने आपत्ती व्यवस्थापनाकरिता नेहमीच सज्ज राहायला हवे. खरे तर आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक धडे शालेय स्तरापासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल चे़ विद्यासागर राव यांनी आज येथे केले़
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत मंच येथे ३ जून ते १२ जून या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर, आव्हान-२०१९ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले होते़ तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख तसेच विशेष कार्य अधिकारी डॉ. अतुल साळुंके, विशेष कार्य अधिकारी बी. वेणूगोपाल रेड्डी, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी हे उपस्थित होते.
राज्यपाल चे. विद्यासागर राव म्हणाले, भारत देश हा विकसनशील देशांमधील अग्रेसर देश आहे. एकविसाव्या शतकातील सर्वात तरुण देश म्हणून भारताकडे सबंध जग पहात आहे. अशा या टप्प्यावर भारताकडे असलेल्या युवा शक्तीचा वापर राष्ट्रहितासाठी प्रगतीसाठी योग्य मागार्ने होणे गरजेचे आहे. प्रगत देशांमध्ये सामाजिक शिस्त, देशाप्रतीचे प्रेम, नागरी कर्तव्यांचे काटेकोर पालन आणि आपत्ती व्यवस्थापनाची पूर्ण तयारी या तीन गोष्टींकडे गांभीर्याने पाहिले जाते़ आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन याविषयीची जनजागृती यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते, असे ही ते म्हणाले़
या प्रशिक्षण शिबिरात राज्याच्या विविध महाविद्यालयांमधून आलेल्या ८०० मुले व ६०० मुलींचे राज्यपाल राव यांनी स्वागत करून या प्रशिक्षणाचा सर्वार्थाने लाभ घ्या आणि समाजाला उपयोगी पडेल असे काम करा, असे आवाहन करून जिल्हा प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्यांची निश्चितच मदत होईल, असा विश्वासही राज्यपाल राव यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ. अतुल साळुंखे यांनी केले. आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठातील संचालक डॉ. शिवराज बोकडे यांनी केले.