कोरोना नसलेल्या रुग्णांसाठी सुविधा वाढविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:18 AM2021-04-22T04:18:07+5:302021-04-22T04:18:07+5:30
सध्या कोरोनाचा कहर वाढलेला आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनानेही कोरोना रुग्णांना उपचार देण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. मात्र, त्याचवेळी ...
सध्या कोरोनाचा कहर वाढलेला आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनानेही कोरोना रुग्णांना उपचार देण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. मात्र, त्याचवेळी इतर आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये. सध्या लहान मुलांच्या तपासण्या काही प्रमाणात बंद झाल्या आहेत. दुसरीकडे गरोदर महिलांच्या तपासण्याही सुरळीत नाहीत. अनेक ऑपरेशन थिएटर बंद असल्याने गंभीर आजाराच्या रुग्णावरील शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर या दोन्हींचा बॅलन्स राहील, अशी आरोग्य यंत्रणा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे. काही ठिकाणी गरोदर महिला शस्त्रक्रियेसाठी आल्यानंतर त्यांना भटकावे लागल्याच्या घटना पुढे आल्या आहेत.
चौकट--------------
गरोदरपणाशी संबंधित काम थांबलेले नाही. शस्त्रक्रिया सुरू आहे. रुग्णही येत आहेत. मात्र, नांदेड शहरामध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक रुग्ण नांदेड शहरात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने तालुकास्तरावर उपचार घेत आहेत. प्रसूतीसाठी खाजगी रुग्णालये फारशी पुढे येत नसली, तरी काही खाजगी रुग्णालयांसह सरकारी रुग्णालयांत प्रसूती होत आहेत. -डॉ. किशोर अतनुरकर
इतर आजारांच्या रुग्णांकडे काहीसे दुर्लक्ष होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. कोरोनाच्या संधीचा काही जण गैरफायदा घेत असल्याचेही दिसून येते. कोरोना रुग्णांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर नॉन कोविड रुग्णांनाही आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवा. डॉक्टरांनीही यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.- डॉ. अशोक बेलखोडे
चौकट-------------
गरोदर स्त्रियांसाठी स्वतंत्र सेंटरची गरज
गरोदर स्त्रियांच्या तपासण्या तसेच शस्त्रक्रिया थांबविता येत नाहीत. त्यामुळे गरोदर महिलांना सेवा देणारे स्वतंत्र सेंटर सुरू करण्याची गरज आहे. या केंद्रासाठी खाजगी डॉक्टरांचीही मदत घेता येऊ शकते. गरोदर महिलांना रांगेत उभे राहता येऊ शकत नाही. त्यामुळे असे सेंटर कार्यान्वित केल्यास गरोदर महिलांना योग्य ते उपचार मिळतील. जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांच्याकडेही मी अशी मागणी केली असल्याचे डॉ. किशोर अतनुरकर यांनी सांगितले.
शहरातील शासकीय रुग्णालये- ४
एकूण खाजगी रुग्णालये- २५०
शासकीय कोविड सेंटर - ४
नॉन कोविड उपलब्ध बेड- ३५०
कोविड खाजगी रुग्णालये- ४४