उपेक्षित, दुर्लक्षित, गरजू ज्येष्ठ नागरिकांचा १४ रोजी लक्षवेधी मुखपट्टी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:19 AM2021-02-11T04:19:35+5:302021-02-11T04:19:35+5:30
एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ १८ टक्के लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची आहे. नैसर्गिकरीत्या वयोमानाने त्यांच्यातील क्रयशक्ती कमी झाली आहे. ते आता ...
एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ १८ टक्के लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची आहे. नैसर्गिकरीत्या वयोमानाने त्यांच्यातील क्रयशक्ती कमी झाली आहे. ते आता कमवते राहिलेले नाहीत. ज्येष्ठ नागरिक हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जगत आहेत. काहींची मुले, मुली शिक्षणासाठी व व्यवसायासाठी ज्येष्ठांना सोडून शहरात किंवा देशाबाहेर गेलेली आहेत. काही ज्येष्ठ नागरिक कुटुंबास ओझे आहेत व त्यांचा छळ पण केला जातो आहे. त्यांच्याकडे पाहण्यासाठी कोणीही तयार नाही. अवर्षण, अतिवृष्टी, वादळ, कोरोनासारख्या महामारीचा उद्रेक याने ज्येष्ठ त्रस्त झालेले आहेत. काहींना रक्तदाब, मधुमेह, दमा, संधिवात, कर्करोग आदी वयोमानानुसारचे आजारपण त्रास देत आहेत. परिणामतः ज्येष्ठ पूर्णपणे कोलमडले आहेत. ज्येष्ठांना कोणीही वाली नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात फेस्कॉमने ज्येष्ठांच्या मागण्यासाठी सरकारकडे सतत पाठपुरावा चालू ठेवला आहे.
ज्येष्ठ नागरिक धोरण मान्य करून तंतोतंत त्वरित अंमलबजावणी करणे, ज्येष्ठांची वयोमर्यादा ६० वर्षे मान्य करणे, इतर राज्यांप्रमाणेच विनाअट उपेक्षित, दुर्लक्षित तथा गरजू ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमाह किमान ३ हजार ५०० रुपये (दोन वेळचे जेवण व चहापाणी) मान्य करून चालू करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणे, आरोग्यदायी योजनेसाठी दारिद्र्यरेषेखालील असलेली बंधनकारक अट रद्दबातल करणे, प्रवास दरात ५० टक्के सवलत व शासन मान्य ज्येष्ठ नागरिक पत्र तथा आधार कार्डच ग्राह्य धरणे आदी मागण्या केल्या आहेत.