ट्रक चालकाची बेपर्वाई; कार, दुचाकी, टेम्पोस उडवत पानटपरीस ४० फुट फरफटत नेले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 07:24 PM2023-01-25T19:24:00+5:302023-01-25T19:24:36+5:30
भोकर बायपासवर ट्रकने उडवल्याने कार चालक गंभीर जखमी झाला आहे
भोकर ( नांदेड): चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रकने कारसह टेम्पो, दुचाकी आणि पानटपरीला जबर धडक दिल्याची घटना आज दुपारी येथील म्हैसा बायपास चौक येथे घडली आहे. यात कार चालक गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला नांदेडला रवाना करण्यात आले आहे.
भोकर बायपासवरील म्हैसा कडून नांदेडकडे सिमेंट वाहतूक करणारा ट्रक (क्रं. टिएस ०१ यु ए ७७१२) भरधाव वेगाने जात होता. दरम्यान भोकर येथून उमरीकडे जाणाऱ्या कारला (क्र. एम एच २६ एए ५५५६) बायपासवरील सुभेदार रामजी चौक येथे ट्रकने जबर धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित ट्रकने रस्त्यावर उभी दुचाकी, टेम्पो (क्रं. एम एच २६ एडी ५५४०) आणि पान टपरीस जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात कार चालक शुभंम अनिल पांचाळ (२२, रा. भोकर ) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी नांदेडला रवाना करण्यात आले आहे.
पानटपरीस ४० फुट फरफटत नेले
या भीषण अपघातात टेम्पोचा चुराडा झाला. तर ट्रक पलटी होवून एका पान टपरीवर आदळला. त्यानंतर ट्रकने पान टपरीस ४० फुट दूर फरफटत नेले. दरम्यान, ट्रक चालक घटना स्थळावरुन पसार झाला असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. याच ठिकाणी दि. २३ डिसेंबर २०२२ रोजी एका भरधाव ट्रकने ऑटोरिक्षाने दिलेल्या धडकेत एका प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.