प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे; नियमांची पायमल्ली करीत लालपरी सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 07:31 PM2020-09-18T19:31:17+5:302020-09-18T19:35:33+5:30
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने निर्देशित केलेल्या सूचनांना एसटी महामंडळाकडून केराची टोपली
- श्रीनिवास भोसले
नांदेड : राज्य शासन आणि आरोग्य विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करत एसटी सुसाट धावत आहे़ त्यातून कोरोनाचा फैलावही त्यात गतीने होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ नांदेड विभागात जवळपास ३५ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे़ तर गर्दीवर नियंत्रण नसल्याने प्रवाशांच्या माध्यमातून कोरोचा शिरकाव झपाट्यानू होवू शकतो़ त्यामुळे वेळीच महामंडळाने सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे़
कोरोनाचा संसर्ग होवू नये आणि संसर्गाची साखळी तोडण्याच्या हेतूने राज्य आणि केंद्र शासनाने लॉकडाऊन घेतला़ या महामारीमुळे इतिहासात पहिल्यांदाच एसटी तब्बल तीन महिने एकाच जागी होती़ त्यानंतर विविध अटी आणि नियमांचे पालन करून प्रवाशी वाहतूकीस मुभा देण्यात आली़ परंतु, अल्पावधीतच नियम धाब्यावर घालत नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्वच बसेस सुसाट धावत असल्याचे चित्र गुरूवारी पहायला मिळाले़ जिल्हाअंतर्गत धावणाऱ्या प्रत्येक बसमध्ये ३५ पेक्षा अधिक आणि जास्तीत जास्त ५२ प्रवाशी पहायला मिळाले़ जे नियमाने २२ प्रवाशीच प्रवास करू शकतात़ त्यातही बहुतांश जणांच्या तोंडाला मास्क नव्हते़ एसटीचा चालकही विनामास्क होता तर वाहकाने तोंडाला रूमाल बांधलेला होता़ तोच रूमाल काढून तो तोंडही पुसत होता आणि मास्क म्हणूनही वापरत होता़
कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह व निगेटिव्ह सांगण्याच्या सध्याच्या पद्धतीमुळे रुग्णाला इन्फेक्शन किती झाले, हे समजत नाही.https://t.co/HdEomXvjmn
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 18, 2020
दरम्यान, प्रवाशांकडूनदेखील नियमांना खो दिला जात आहे़ यामध्ये तीसीच्या आत असणाऱ्या तरूण प्रवाशांना तर आम्हाला कोरोना होणारच नाही, या अविर्भावामध्ये बसस्थानक परिसरात वावरत आहेत़ तर प्रवाशी वाहतूक करण्यापूर्वी आणि केल्यानंतर बसेस सॅनिटाईज करणे गरजेचे आहे़ परंतु, नांदेड आगारात बसेस सॅनिटाईज केल्या जात नसल्याचे आढळून आले़ त्याचबरोबर चालक, वाहकांकडेही हॅण्डसॅनिटाईज उपलब्ध नव्हते़ त्यामुळे प्रवाशांसह चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांची सूरक्षा रामभरोसे असल्याचे दिसते़ नांदेड विभागातील लागण झालेल्या कर्मचऱ्यांपैकी २० जण उपचार घेवून घरी परतले आहेत़
प्रशासनाचे दुर्लक्ष : ना सॅनिटाईजिंग ना थर्मल स्कॅनिंग
नांदेड विभागातून पुणे, औरंगाबाद, पंढरपूर, कोल्हापूर अशा लांबपल्ल्याच्या बसेसदेखील सुरू करण्यात आल्या आहेत़ परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सुरूवातीला ज्याप्रमाणे नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले़ तसे सध्या दिसून येत नाही़ गर्दीवर नियंत्रण नाही की बसमधील प्रवाशांवऱ बसेसला दिवसेंदिवस वाढणारी गर्दी पाहता प्रशासनाकडून प्रवाशांच्या अथवा कर्मचाऱ्यांच्या थर्मल स्कॅनिंगकडे दुर्लक्ष करण्यात आले़ तसेच बसमध्ये चढत असताना गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नाही़ एका सीटवर तीन तीन प्रवाशी बसून बिनधास्तपणे विनामास्क प्रवास करत आहेत़ कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन घेण्यात आला़ सध्या जिल्ह्यात दररोज तीनशे ते चारशे रूग्ण वाढत असून कुठेही बेडची सुविधा उपलब्ध नाही़ अशा परिस्थितीत नागरिकांसह प्रवाशांनी नियमांचे पालन करणे गरजेचे असताना एसटीसह नागरिकही सुसाट धावत आहेत़
कोरोना पार्श्वभूमीवर शासन निर्देशित सूचना
- प्रवाशांनी बसमध्ये मास्क वापरणे बंधनकारक आहे़
- बसमध्ये फक्त २२ प्रवाशी प्रवास करू शकतात़
- प्रवाशांनी बसमध्ये चढताना आणि उतरतांना सोशल डिस्टन्सिंग पाळणे
- प्रवाशांसह चालक, वाहकांनी सॅनिटायझरचा वापर करणे
- प्रवाशी वाहतूक झाल्यानंतर बसेस सॅनिटाईझ करून घेणे गरजेचे़
सर्व सूचनांचे पालन केले जाते
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासन आणि आरोग्य विभागाकडून ज्या सूचना आल्या आहेत़ त्याचे पालन केले जात आहे़ तसेच वाहकांना मास्क वापरण्याच्या सूचना वारंवार दिल्या जातात़ प्रवाशी वाहतूक केल्यानंतर बसेस सॅनिटाईझ करून घेतल्या जातात़ लक्षणे असलेल्या कर्मचाऱ्यांना ड्युटी दिली जात नाही़
- अविनाश कचरे, विभाग नियंत्रक, नांदेड़