नवे ‘इन’ जुने ‘आऊट’? नांदेडमध्ये चव्हाण-चिखलीकर विरोधकांच्या पुन्हा कोलांटउड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 17:17 IST2025-02-25T17:17:05+5:302025-02-25T17:17:34+5:30

आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्याकडून आता जिल्हा राष्ट्रवादीची संपूर्ण कमांड आपल्या हाती घेण्याच्या हालचालींना वेग

new coming, old out going; In Nanded Ashok Chavhan - Prapat Patil Chikhalikar supporters changes mind | नवे ‘इन’ जुने ‘आऊट’? नांदेडमध्ये चव्हाण-चिखलीकर विरोधकांच्या पुन्हा कोलांटउड्या

नवे ‘इन’ जुने ‘आऊट’? नांदेडमध्ये चव्हाण-चिखलीकर विरोधकांच्या पुन्हा कोलांटउड्या

नांदेड : महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांनी आता आपापले पक्षसंघटन वाढविण्यावर भर दिला आहे. आजघडीला भाजपमध्ये सर्वाधिक इनकमिंग सुरू असताना शिंदेसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही या स्पर्धेत उडी घेतली आहे. आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्याकडून आता जिल्हा राष्ट्रवादीची संपूर्ण कमांड आपल्या हाती घेण्याच्या हालचालींना वेग देण्यात आला आहे. आगामी काळात जुन्या चेहऱ्यांना बाजूला करून नवीन चेहऱ्यांकडे जबाबदाऱ्या दिल्या जातील. आपसूकच पूर्वीच्या राष्ट्रवादीप्रमाणेच अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीतही दोन गट पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचा धर्म पाळत लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकाही हातात हात घालून एकत्रित लढल्या. पण, आता आगामी काळात होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये मात्र एकमेकांचा हात सोडत स्वतंत्र लढण्याच्या तयारीत दिसत आहेत. आजघडीला भाजपसह शिंदेसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही ‘एकला चलो रे’ची भाषा सुरू केली आहे. त्यातूनच पक्षप्रवेश आणि एकमेकांच्या विरोधकांना बळ देण्याची जिल्ह्यातील नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाल्यानंतर साहेबांना साथ देत तब्बल पंधरा तालुकाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी तुतारी फुंकण्याचे काम केले. मात्र, कार्याध्यक्ष जीवनराव घोगरे, भोकरचे तालुकाध्यक्ष विश्वांभर पवार यांच्यासह अनेकांनी दादांना साथ दिली. त्यानंतर या दोघांना जिल्हाध्यक्षपदाची लॉटरीही लागली. परिणामी त्यांना शिंदे सरकारच्या कार्यकाळात संघटनात्मक बांधणीसह विकासावर भर देता आला. पण, विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकांनी आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातूनच विश्वांभर पवार यांची जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, अद्याप त्यांना पक्षाने कोणती जबाबदारी दिली नाही. उलट भाजपच्या अनेकांनी बंडखोरी करत विधानसभेची निवडणूक लढविली. त्यांना निवडणूक काळात सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. पण, भाजप प्रदेश नेतृत्वाने पुन्हा त्यांना सहा महिन्यांतच सन्मानपूर्वक पक्षात घेतले. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार अथवा प्रदेशाध्यक्षांनी अद्याप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेतले नाही.

पवार भाजपमध्ये, तर ढगे राष्ट्रवादीत
भाजपच्या कृतीवर शिंदेसेनेसह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. तरीदेखील भाजपच्या नेतृत्वाने बंडखोरांचे पक्षप्रवेश थांबवले नाही. त्यानंतर आता शिंदेसेनेसह राष्ट्रवादीनेही अनेकांना निधीसह विविध पदांचे आश्वासन देत आपल्याकडे ओढण्याचा सपाटा लावला आहे. आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या विरोधात दंड थोपटलेले एकनाथ पवार यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. तर भोकरमधील दादाराव ढगे, सुरेश राठोड आदींनी हाती घड्याळ बांधले.

पूर्वीप्रमाणेच गटतटाचे राजकारण?
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे मंत्री असताना देखील गटतटाच्या राजकारणामुळे पक्षाचा विस्तार होऊ शकला नाही. परिणामी नेहमीच काँग्रेस एक नंबरवर राहिली. पूर्वी सूर्यकांता पाटील आणि कमलकिशोर कदम असे दोन गट राष्ट्रवादीत होते. त्यामुळेच अनेक ज्येष्ठ अन् अनुभवी नेते असूनही राष्ट्रवादीला जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नाही. आजघडीला चिखलीकरांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी करताना गटतटाचे राजकारण होणार नाही, याकडे प्रदेशनेतृत्वाने लक्ष घालण्याची गरज आहे.

Web Title: new coming, old out going; In Nanded Ashok Chavhan - Prapat Patil Chikhalikar supporters changes mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.