कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचा नवपिकाचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:31 AM2020-12-14T04:31:50+5:302020-12-14T04:31:50+5:30
कंधार : निसर्गाचा लहरीपणा, खरीप हंगामाने दिलेला दगा अन् बिघडलेले शेतीचे अर्थकारण. यातून नवीन पीक प्रयोग घेण्याचा प्रयत्न शेतकरी ...
कंधार : निसर्गाचा लहरीपणा, खरीप हंगामाने दिलेला दगा अन् बिघडलेले शेतीचे अर्थकारण. यातून नवीन पीक प्रयोग घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. तालुक्यात १५० एकरांवर शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे. अवघ्या २० गुंठे जमिनीत बटाटा लागवड करून पंढरी भोसीकर यांनी १ लाख ५० हजारांचे उत्पन्न काढून आर्थिक बळकटीकरण करण्याचा संकल्प केला आहे. बटाटा लागवडीने शिवार हिरवेगार झाले असून, लक्ष वेधून घेत आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या वर्षी खरीप हंगामाने दगा दिला. निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. तरीही शेतकरी रब्बी व इतर पीक लागवड करून आर्थिक स्त्रोत शोधत आहेत. यंदा पहिल्यांदाच बटाटा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पेठवडज, उस्माननगर, हिप्परगा, बाभूळगाव, दाताळा, शिराढोण, संगमवाडी, पानशेवडी, तळ्याचीवाडी, भंडारकुमठ्याचीवाडी, जांभूळवाडी, बहाद्दरपुरा, नवरंगपुरा, बिजेवाडी तांडा, लालवाडी, कंधार, कंधारेवाडी, चिंचोली, आलेगाव, पानभोसी आदी गावांतील शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे.
तालुक्यात सुमारे ६० हेक्टर क्षेत्रावर बटाटा लागवड झाली असल्याचे समोर आले आहे. तालुक्यात माळरान, भुसभुशीत, मध्यम प्रतीची, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीचे प्रमाण मोठे आहे. त्यातच उपलब्ध जलसाठा व नवीन शेती तंत्रज्ञानाची सांगड घालून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकरी सरासावला असल्याचे चित्र आहे. योग्य पाणी व्यवस्थापन, खताची मात्रा, जमिनीची निवड, लागवड व संगोपन आदींचा समन्वय साधत शेतकरी बटाटा लागवड करून आर्थिक बळकटीकडे वळला आहे. ता. कृषी अधिकारी रमेश देशमुख, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक आदींचे मार्गदर्शन घेऊन नवीन पीक प्रयोग केला जात आहे.
पानभोसी ता. कंधार येथील पंढरी भोसीकर यांनी २० गुंठे शेतीवर ऑक्टोबरअखेर अडीच क्विंटल बटाटे बेणे आणून लागवड केली आहे. मूग काढणीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. मग हेच भूसभशीत क्षेत्र बटाटा लागवडीसाठी तयार केले. त्यावर तिफण फिरवून एका वितभर अंतराने बेणे लागवड केले. ठिबक अंथरून पाण्याची सोय केली. पोटॅश, जैविक, १८:१८ :१० खताचे मिश्रण करून खताची मात्रा दिली. एकूण १० हजार रुपये बेणे, मजुरी, खत आदी लागवडीवर खर्च केला. आणि अल्प खर्चावर अधिक मिळकत होण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.
साधारण तीन महिन्यांचे असलेले बटाटा पीक २० गुंठ्यांत ६० ते ७० क्विंटल निघेल, अशी एकंदरीत स्थिती असून बाजारात सध्या अडीच ते तीन हजार रु. प्रतिक्विंटल भाव आहे. त्यामुळे खर्च वजा करता दीड लाख रुपये नफा मिळण्याची अपेक्षा आहे, असे पंढरी भोसीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.