काळ्या बाजारासाठी नव्याने मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:51 AM2018-12-17T00:51:28+5:302018-12-17T00:53:16+5:30
नांदेडात झालेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याचा तपास अद्याप सुरुच असताना या घोटाळ्यातील आरोपींनी आता धान्य काळा बाजारासाठी नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली आहे़
नांदेड : नांदेडात झालेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याचा तपास अद्याप सुरुच असताना या घोटाळ्यातील आरोपींनी आता धान्य काळा बाजारासाठी नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली आहे़ त्यासाठी नव्या दमाच्या दलालांची नियुक्तीही करण्यात आली आहे़ त्यामुळे धान्याचा हा काळाबाजार अद्यापही सुरुच असल्याचे दिसून येते़
कृष्णूरच्या इंडिया मेगा अॅग्रो अनाज कंपनीवर पोलिसांच्या छाप्यात दहा ट्रक शासकीय धान्य पकडले होते़ त्यानंतर तपासात हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असल्याचे उघडकीस आले़ सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडून हा तपास गुप्तचर विभागाकडे गेला आहे़ या प्रकरणात आतापर्यंत एकाही आरोपीला अटक झाली नाही़
असे असताना धान्याच्या काळा बाजारासाठी मात्र या व्यवहारातील मास्टर मार्इंड पुन्हा कामाला लागले आहेत़ तालुका आणि जिल्हा पातळीवर काळाबाजारासाठी नव्या दमाच्या दलालांची निवड करण्यात आली आहे़ नवीन लोकांना सोबत घेवून पुन्हा ही साखळी तयार करण्यात येत आहे़ त्यामुळे एवढा मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतरही या प्रकरणातील आरोपी पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते़
इंडिया मेगा अॅग्रो अनाज कंपनीत पडलेल्या धाडीप्रमाणेच नांदेड एमआयडीसी आणि कृष्णूर येथे असलेल्या तीन मोठ्या कंपन्यांची उलाढालही कोट्यवधी रुपयांमध्ये आहे़ त्यामुळे या ठिकाणीही धान्याचा काळाबाजार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे या कंपन्यांचीही तपासणी गुप्तचर विभागाकडून होणार का? हा कळीचा मुद्दा आहे़ या कंपन्यांची तपासणी झाल्यास यामध्ये आणखी मोठे घबाड हाती लागण्याची दाट शक्यता आहे़ तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी घोटाळेबाजांना पळता भुई थोडी केली होती़ त्यात आता धान्य घोटाळा करणाऱ्यांची साखळी पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव काही कठोर पावले उचलतील का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे़
नाशिकमध्ये मोक्काची शिफारस, नांदेडात मोकळेच
शासकीय धान्याचा काळाबाजार करणा-यांच्या विरोधात नाशिक पोलिसांनी ५८ महसूल अधिकारी, कर्मचाºयांविरोधात मोक्काअन्वये कारवाई करण्याची शिफारस करीत न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केले आहे़ त्यामुळे खळबळ उडाली आहे़ नांदेडातील धान्य घोटाळा तर त्यापेक्षा अधिक मोठा आहे़ सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी त्यावेळी तशी तयारीही केली होती़ परंतु, त्यांच्याकडून तपास गुप्तचर विभागाकडे देण्यात आला़ त्यामुळे हा विषय थांबला़