माथाडी कामगारांना नववर्षाची भेट; मंडळाकडून थकीत मजूरीपोटी २ कोटी अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 06:24 PM2020-01-01T18:24:27+5:302020-01-01T18:29:34+5:30

माथाडी मंडळाच्या नियमानूसारच मिळणार हमालांना मजूरी

New Year gift to Mathadi workers; The Board paid 2 crores for arrears in Nanded | माथाडी कामगारांना नववर्षाची भेट; मंडळाकडून थकीत मजूरीपोटी २ कोटी अदा

माथाडी कामगारांना नववर्षाची भेट; मंडळाकडून थकीत मजूरीपोटी २ कोटी अदा

Next
ठळक मुद्देसंघटनेच्या पाठपुराव्याला यश नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रक्कम माथाडी हमालांच्या खात्यावर वर्ग

- श्रीनिवास भोसले

नांदेड : शासकीय अन्न धान्य गोदामावरील माथाडी कामगारांना माथाडी मंडळाने ठरवून दिलेल्या हमाली कामाच्या आधारभूत दराने मजूरी अदा करण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिले आहेत़ त्यानूसार जिल्हा प्रशासनान सहा महिन्यांचे थकीत देयकापोटील जवळपास २ कोटी रूपये माथाडी मंडळाकडे वर्ग केले़ नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सदर रक्कम माथाडी हमालांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याने कामगारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे़

जिल्ह्यातील शासकीय अन्नधान्य गोदामामधील हमाली कामाच्या निविदा २०१८ मध्ये काढण्यात आल्या होत्या़ त्यामध्ये हमाली कामाचे आधारभूत दर निश्चित करण्याचे अधिकार हे माथाडी मंडळालाच देण्यात आले होते़ त्याप्रमाणे ३० मे २०१८ रोजी माथाडी मंडळाने कामाचे आधारभूत दर निश्चित करून आपल्या कार्यालयाला कळविले होते आणि तेच दर सदर कार्यालयाने मंजूर केले होते़ परंतु, त्यानूसार माथाडी कामगारांना मजूरी दर मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत होते़

यासंदर्भात नांदेड हमाल मापाडी हातगाडा संघाचे  सचिव भुजंग कसबे यांनी संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविला़ त्यासाठी संघटकडून पुरवठा विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला़ सदर पत्राचे अवलोकन करून जिल्हा प्रशासनाकडून एक प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला होता़ सदरील प्रस्तावाची पुरवठा विभाग, मंत्रालय येथे योग्यता तपासण्यात आली़ पुढे २० सप्टेंबर २०१९ रोजी माथाडी मंडळाने ठरवलेले आधारभूत दर हे माथाडी कामगारांना देण्यास हरकत नसल्याचेही मंत्रालयातून कळविण्यात आले़ परंतु, त्या पत्रावर काही जणांनी शंका उपस्थित केल्या होत्या़ सदर शंकाचे निरसन होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली ३ सुनावण्या घेण्यात आल्या़ त्यानंतर पुन्हा सदर पत्रावर मार्गदर्शन मागविण्यात आले़ त्यानंतरही पुरवठा विभाग, मंत्रालय यांनी १ जानेवारी २०१९ पासून हमाली कामाचे देयके ही  माथाडी मंडळाने ठरवून दिलेल्या आधारभूत दरानूसार कार्यरत हमालांना  देण्यात यावे, असे स्पष्ट केले़ त्यानंतर जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील २४ गोडावूनमध्ये कार्यरत हमालांच्या थकीत देयकांचे १ कोटी ९६ लाख रूपये पुरवठा विभागामार्फत माथाडी मंडळाकडे वर्ग करण्यात आले होते़ सदर रक्कम १ जानेवारी रोजी माथाडी कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सचिव भुजंग कसबे यांनी सांगितले़

कर्मचाऱ्यांप्रमाणे एकदाच मिळतेय हमाली
शासकीय अन्नधान्य गोदामामध्ये कार्यरत माथाडी कामगार, हमालांना  गाडी उतरविणे, माप करणे, पोत्यांची थपी मारणे़ परतीसाठी थपीतील पोते ट्रकमध्ये भरणे आदी कामे करावी लागतात़ त्या हमालीपोटील पूर्वी एका हमालास प्रतिक्विंटल जवळपास २० रूपयांपर्यंत हमाली मिळत असे़ परंतु, सदर रक्कम वेगवेगळ्या टप्प्यात विविध ठिकाणाहून घ्यावी लागत होती़ परंतु, नव्या नियमानूसार सदर रक्कम शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराप्रमाणे एकदाच मिळत असल्याने हमाल कामगारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे़

नववर्षाची भेट मिळाली

पूर्वी महिन्याला एका हमालास महिन्याकाठी दहा ते बारा हजार रूपये हमाली मिळत होती़ परंतु, नवीन दरानूसार १७ ते २० हजार रूपये मिळत आहेत़ मागील सहा महिन्याचे थकीत रक्कम २२़७५ रूपये दराने देण्यात येत आहे़ वर्षभरापासून हमालांची देयके थकीत आहेत़ त्यापैकी सहा महिन्यांचे देयके अदा करण्यासाठी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली माथाडी मंडळाकडे १ कोटी ९६ लाख रूपये वर्ग करण्यात आले़  जिल्ह्यात शासकीय अन्नधान्याची जवळपास २४ गोडावून  आहेत़ या सर्व गोडावूनमध्ये महिन्याभरात १३ ते १४ हजार मेट्रीक टन मालाची आवक जावक होते़ सदर माल उतरविण्याचे आणि तो पुन्हा ट्रकमध्ये चढविण्याचे काम जवळपास २२५ माथाडी कामगार हमालांवर आहे़ त्यांच्याच मजूरीचा प्रश्न वर्षभरांपासून प्रलंबित होता़ तो नववर्षाच्या प्रारंभीच मार्गी लागल्याने कामगारांना ही नववर्षाची भेट मानली जात आहे़  

दर ठरविण्याचे अधिकार मंडळास
महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ चे कलम ३ (ड) नूसार माथाडी कामगारांच्या वेतनाचे दर ठरविण्याचे अधिकार माथाडी मंडळास आहे़ त्यामुळे नांदेड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाने ठरवून दिलेले आधारभूत दर जिल्ह्यातील शासकीय गोदामावरील माथाडी कामगारांना पूर्वलक्षी प्रभावाने १ जानेवारी २०१९ पासून मंजूर करण्यात यावेत, अशा सूचना राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव सतीश सुपे यांनी केल्या़ 

Web Title: New Year gift to Mathadi workers; The Board paid 2 crores for arrears in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.