भाजपात नव्याने आलेल्यांनी माझ्या विरोधात पैसे वाटले; शिंदेसेनेच्या आमदारांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 15:55 IST2025-02-01T15:53:58+5:302025-02-01T15:55:38+5:30
महायुतीत एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित होते. परंतु नव्याने भाजपात आलेल्या मंडळींनी माझ्या विरोधात काम केले.

भाजपात नव्याने आलेल्यांनी माझ्या विरोधात पैसे वाटले; शिंदेसेनेच्या आमदारांचा गौप्यस्फोट
नांदेड : महायुतीत मला प्रचंड त्रास झाला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात नव्याने आलेल्या मंडळींनी माझ्या विरोधकांचे पैसे वाटले. मला पाडण्यासाठी या मंडळींनी विरोधकांसोबत बैठका घेतल्या. महायुतीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे मला केवळ साडे तीन हजारांचे मताधिक्य मिळाले. प्रत्यक्षात मी ज्याप्रमाणे मतदारसंघात काम केले. ते पाहता माझी लीड ५० हजारांची असायला हवी अशा शब्दात आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यानिमित्त आयोजित बैठकीत आमदार कल्याणकर बोलत होते.
ते म्हणाले, एवढे काम करूनही मताधिक्य कमी मिळत असेल तर आपल्याला आत्मपरीक्षण करावे लागेल. महायुतीत एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित होते. परंतु नव्याने भाजपात आलेल्या मंडळींनी माझ्या विरोधात काम केले. मी जर पडलो असतो तर कोण निवडून आला असता? महायुतीत आपल्यावर मोठा अन्याय झाला आहे. महायुतीचा धर्म आम्हीच पाळायचा का? आता आमचीच माणसे फोडण्याचे काम सुरु आहे. त्यांना फोन केले जात आहेत. पण आम्हीही त्यांची माणसे फोडू शकतो ती ताकद आमच्यात आहे हेही त्यांनी लक्षात ठेवावे असा इशाराही कल्याणकर यांनी दिला. दरम्यान, कल्याणकर यांच्या गौप्यस्फोटाने उपस्थित शिवसेना पदाधिकारी अवाक झाले होते.
जिल्ह्यात इंग्रजाच्या नीतीचा अवलंब
जिल्ह्याचे राजकारण आजपर्यंत ज्यांनी केले त्यांनी इंग्रजांची फोडा आणि राज्य करा ही नीती वापरली. जिल्ह्यात आता शिवसेनेचे चार आमदार असल्यामुळे अनेकांच्या पोटात दुखायला लागले आहे. आमच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु त्यांच्या या नीतीला कुणी बळी पडू नका. आता मी आणि बालाजीराव दोघांनीही मंत्रिपद मागितले होते. बालाजीरावांनी मंत्रिपद मागितले म्हणून मी त्यांचा डूक धरायचा अशा वृत्तीचा मी माणूस नाही. प्रत्येकाला मोठं व्हावं वाटते. परंतु कार्यकर्त्यांनीही चारचौघात उघडपणे आमदारांच्या विरोधात बोलणे टाळावे, असे आवाहन आमदार हेमंत पाटील यांनी केले.