एनजीटीकडून मनपाला घनकचरा विल्हेवाटप्रकरणी ४० लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:44 AM2020-12-11T04:44:43+5:302020-12-11T04:44:43+5:30
शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु आजपर्यंत घनकचरा व्यवस्थापन होऊ न शकल्यामुळे एनजीटीने ४०लाखाचा दंड ...
शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु आजपर्यंत घनकचरा व्यवस्थापन होऊ न शकल्यामुळे एनजीटीने ४०लाखाचा दंड ठोठावला आहे. डिसेंबरच्या नंतरही घनकचऱ्याचे व्यवस्थापन झाले नसेल तर माहे जानेवारी २०२१ पासून प्रती महिन्याला ५ लाखाचा दंड लावण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रात दररोज शेकडो टन घनकचरा उचलण्यात येतो परंतु त्याची योग्य विल्हेवाट लावल्या जात नाही. परिणामी प्रदूषण अधिक वाढत आहे. पर्यावरणावर या प्रदूषणामुळे परिणाम होतो, ही बाब राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणाने अधिक गंभीरतेने घेतलेली आहे. एनजीटीने दिलेला निर्णय हा देशभरासाठी लागू राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्डाने महापालिकेला घनकचरा व्यवस्थापन करण्यात हलगर्जीपणा झाल्याचे मानून ४०लाखाचा दंड लावला आहे. हा दंड डिसेंबर अखेरपर्यंत भरावा लागणार आहे.
जानेवारीत घनकचरा विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प सुरू होणार
तुप्पा येथे महापालिकेच्यावतीने ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प उभा करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यामध्ये असून डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. जानेवारी २०२१ मध्ये घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू होईल. सध्या तुप्पा डंपिंग ग्राऊंडवर प्रकल्पाच्या ठिकाणी मशिन बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याचबरोबर ड्रेनेजच्या बाबतीत विकास आराखडा तयार झाला असून नगरोत्थान योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
- डॉ. सुनील लहाने,
आयुक्त मनपा