‘पैनगंगे'च्या पात्रात आढळल्या अखंड दगडावर नऊ पिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 04:31 PM2018-02-16T16:31:46+5:302018-02-16T16:35:13+5:30
विदर्भातील साकूर (पेड) व माहूर तालुक्यातील नेर(पेड) गावाजवळून वाहणार्या पैनगंगा नदीपात्रात २०० वर्ष पुरातन महादेवाची पिंड असलेला अखंड कोरीव दगड आढळला.
श्रीक्षेत्र माहूर : विदर्भातील साकूर (पेड) व माहूर तालुक्यातील नेर(पेड) गावाजवळून वाहणार्या पैनगंगा नदीपात्रात २०० वर्ष पुरातन महादेवाची पिंड असलेला अखंड कोरीव दगड आढळला. दगडावर नऊ पिंड व नंदी कोरलेले स्पष्ट दिसत आहे. ते बाराजोर्तिलिंग असल्याचा अंदाज पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांनी वर्तविला आहे.
विदर्भातील साकूर ते श्रीक्षेत्र माहूरगड जाणारी पायवाट पैनगंगा नदीमधून जाते, त्यावर रोज हजारो लोक माहूरला ये-जा करतात. १० फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे साकूर येथील महिला सीताबाई गेडामसह काही महिला नेर या गावी मजुरीकरिता जात असताना सीताबाई यांची नजर पैनगंगा नदीतील एका दगडावर गेली. त्यांना तिथे एक अखंड दगडावर पिंडीचा आकार दिसला. पिंडीचे दर्शन झाल्याचा आनंद त्यांनी गावातील लोकांना बोलून दाखवला. गावातील नागरिकांनी पिंड पाहण्यासाठी एकच गर्दी केली. त्या दगडाची साफसफाई गावकर्यांनी केली. तेव्हा एक दोन नाही तर तब्बल नऊ पिंड व नंदी स्पष्ट आढळल्याने आता या ठिकाणी बाराजोतिर्लींग असल्याची चर्चा सुरु झाली.
यावर्षी पावसाळा कमी झाल्यामुळे नदीला पूर आला नाही व होती ती वाळू अवैध उपसा झाली़ त्यामुळे नदी पात्रातील संपूर्ण पाणी आटल्याने तसेच रेतीचा उपसा झाल्याने आतील दगड प्रथमच पूर्ण उघडे पडले आहे. सुरुवातीला नदीचे पात्र लहान असताना हे कोरलेले असावे, असा अंदाज आहे. ते किती पुरातन असू शकते, हे सांगणे कठीण असल्याचे गावातील ज्येष्ठ नागरीकांनी सांगितले़ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जत्रा भरत आहे़ लिंबायत, नेर, साकूर, टाकळी येथील भाविकांनी येथे महाप्रसाद सुरू केला. मराठवाडा-विदर्भाच्या मधोमध असलेल्या या ठिकाणी दररोज लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत़ प्रथमच हे ठिकाण आढळल्याचे गावातील मुकेश चंगडे, आनंद चुंगडे, दवणे यांनी सांगितले.