नवव्या महिन्यात १७० कि.मी. चालून रस्त्यात झाली बाळंतीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:03 PM2020-05-18T17:03:47+5:302020-05-18T17:06:40+5:30
कल्याण ते नाशिक जिल्ह्यातील घोटी असा एकूण १७० किलोमीटरचा प्रवास सुजाताने आई-वडिलांसोबत पायी केला. घोटीला पोहोचल्यानंतर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
हदगाव (जि. नांदेड) : लॉकडाऊनमुळे अनेकांना विविध प्रसंगांना तोंड देण्याची वेळ आली आहे. असाच काहीसा प्रसंग हदगाव येथील सुजाता राहुल पवार या गर्भवती महिलेवर आला. नऊ महिन्यांच्या गर्भवती असताना कल्याण ते नाशिक जिल्ह्यातील घोटी असा एकूण १७० किलोमीटरचा प्रवास सुजाताने आई-वडिलांसोबत पायी केला. घोटीला पोहोचल्यानंतर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
हदगाव येथील आठ ते दहा मजूर गरीबीची परिस्थिती असल्याने एका कामगाराच्या सहकार्याने कल्याण (ठाणे) येथे पोट भरण्यासाठी गेले होते. त्यात रामराव बाभूळगावकर यांचाही समावेश होता. कोरोनामुळे शासनाने लॉकडाऊन घोषित केला आणि गुत्तेदाराने काम बंद केले. कामावरील सर्व मजुरांना गावी परत जाण्याचे गुत्तेदाराने सांगितले. गावी जाण्यासाठी एखाद्या वाहनाची सोय करुन द्यावी, अशी विनंती या मजुरांनी गुत्तेदाराकडे केली; परंतु गुत्तेदाराने मी काही करू शकत नाही म्हणून सर्व मजुरांना वाऱ्यावर सोडले.
जाण्याची सोय नसल्याने तसेच हातात काहीही पैसा नसल्याने या सर्व मजुरांनी पायीच जाण्याचा निर्णय घेतला. मात्र यात रामराव बाभूळगावकर यांची चांगलीच अडचण निर्माण झाली. त्यांची मुलगी सुजाता पवार ही गरोदर होती. सुजाताचे नऊ महिने भरलेले असल्याने नऊ दिवसात ती केव्हाही प्रसूत होणार. हातात पैसा नाही. राहायला आधार नाही, तिथेच राहावे तर जगावे कसे, यामुळे ते चिंतेत पडले. अशाही परिस्थितीत सुजाताने आई-वडिलांसह पायी गाव गाठण्याचा निर्णय घेतला. कल्याणहून ते २९ एप्रिलला निघाले. रस्त्याने मिळेल ते खाल्ले व काही वेळ उपाशीही राहण्याची वेळ आली. पाच दिवस चालल्यानंतर घोटी गावाजवळ त्यांचा ताफा थांबला.
यादरम्यान सुजाताला प्रसूतीकळा सुरू झाल्या. योगायोगाने घोटीतच आरोग्य केंद्र होते. गावातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी तिला मदत केली. आरोग्य केंद्रात दाखल केले. सहाव्या दिवशी सुजाताने गोंडस मुलाला जन्म दिला. बाळ व बाळंतीन दोघेही सुखरुप असल्याने दवाखान्यातून सुटी देण्यात आली. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी बाळासह या मजुरांना ८ मे रोजी हदगावला आणून सोडले.
गुत्तेदाराने कामाचे पैसेही बुडविले
कल्याणला हे मजूर ज्या गुत्तेदाराकडे काम करीत होते. त्याने लॉकडाऊननंतर त्यांच्या कामाचे पैसे देण्यास नकार दिला. लॉकडाऊननंतर बघू असे सांगून त्याने सर्वांना वाऱ्यावर सोडले. किमान आठ ते दहा हजार रुपये तरी द्यावेत, अशी विनंती मजुरांनी केली. पण गुत्तेदाराने ऐकले नाही. गावी जाण्यासाठी कुठल्याही वाहनाची व्यवस्था केली नाही. पाच दिवस पायी चालण्याने आलेला थकवा तसेच गुत्तेदाराने पैसा न दिल्याचा राग सुजाताला मुलगा झाल्याच्या आनंदात विसरला होता.