निराधारांचे अनुदान आता थेट खात्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:17 AM2018-03-19T00:17:13+5:302018-03-19T00:17:13+5:30
जिल्ह्यात निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे आयसीआयसीआय बँकेकडून बायोमेट्रीक पद्धतीने अनुदान वाटप करण्यात येत आहे. मात्र मागील वर्षभरापासून बायोमेट्रीक मशीनवर वृद्ध निराधारांचे बोटाचे ठसे उमटत नसल्याने त्यांचे अनुदान रखडले होते. अशा निराधारांचे अनुदान आता थेट बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे आयसीआयसीआय बँकेकडून बायोमेट्रीक पद्धतीने अनुदान वाटप करण्यात येत आहे. मात्र मागील वर्षभरापासून बायोमेट्रीक मशीनवर वृद्ध निराधारांचे बोटाचे ठसे उमटत नसल्याने त्यांचे अनुदान रखडले होते. अशा निराधारांचे अनुदान आता थेट बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.
शासनाच्या निर्देशाप्रमाणे निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान आयसीआयसीआय बँकेकडून बायोमेट्रीक पद्धतीने थेट गावात जावून वाटप केले जात होते. मात्र काही लाभार्थ्यांच्या बोटाचे ठसे बायोमेट्रीक मशीनवर उमटत नव्हते. परिणामी मागील वर्षभरापासून अशा जवळपास ४ हजारांहून अधिक निराधारांचे अनुदान वाटप रखडले होते. याबाबत शासनस्तरावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरूच होते. मात्र निराधार अनुदानाअभावी आर्थिक विवंचनेत सापडले होते.
बोटाचे ठसे उमटत नसल्याच्या अडचणीच्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने बैठक घेऊन ज्या लाभार्थ्यांचे बायोमेट्रीक मशीनवर ठसे उमटत नाहीत, अशा लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या आधार संलग्न बँकामध्ये जमा करण्याचे आदेश दिले. बँकेमार्फत हे अनुदान आता वाटप होणार आहे.
या आदेशानंतर जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी २ हजार ३५२ लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान त्या निराधारांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत. मात्र अजूनही १ हजार ८५२ निराधारांचे बँकेमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया तहसीलस्तरावर सुरूच आहे.
ज्या लाभार्थ्यांना बायोमेट्रीक पद्धतीने निराधार योजनेचे अनुदान प्राप्त झाले नाही अशा लाभार्थ्यांनी आपले आधार व बँक खात्याची झेरॉक्स त्या त्या तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात संजय गांधी योजनेचे २१ हजार ५५० लाभार्थी आहेत तर श्रावणबाळ योजनेचे ३७ हजार १३५ लाभार्थी आहेत. जिल्ह्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेचा २५ हजार ७३९ लाभार्थी लाभ घेतात तर इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेचे १५ लाभार्थी जिल्ह्यात आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमांतर्गत निराधारांचे अनुदान वाटप केले जाणार आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवरील तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार विजय अवधाने यांनी सांगितले. या प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर निराधारांच्या अनुदान वाटपास विलंब होणार नसल्याचे ते म्हणाले.
एनएसएपी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची तयारी
जिल्ह्यात राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमाची तयारी केली जात आहे. निराधारांचे अनुदान आता याच पोर्टल प्रणालीवर वितरित केले जाणार आहेत. जिल्ह्यात २५ हजार ७३९ लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेतात. यातील २३ हजार ७५९ लाभार्थ्यांचे आधार सिडींग करण्यात आले आहे. ही टक्केवारी ९२ टक्के इतकी आहे तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या २२३ लाभार्थ्यांचे आधार सिडींग केले. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेच्या १०० टक्के लाभार्थ्यांचे सिडींग करण्यात आले आहे.