नितीन गडकरी प्रधानमंत्री व्हावेत; शिंदे गटाच्या खासदाराचे रेणुका मातेला साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 05:49 PM2023-05-20T17:49:21+5:302023-05-20T17:50:35+5:30
शिंदे गट - भाजपा राज्यात सत्तेत आहेत, यामुळे खा. पाटील यांच्या या वक्तव्याने नवीन चर्चा सुरु झाली आहे.
नांदेड: देशभरातील चकाचक रस्ते पाहून सर्वसामान्य नागरिकांसोबत रिक्षावालेसुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव घेतात. आगामी काळात भारत देशाला नितीन गडकरी यांच्या रूपाने मराठी पंतप्रधान लाभावा, असे रेणुकामातेला साकडे घातल्याचे खा. हेमंत पाटील यांनी जाहीर भाषणात सांगितले. शिंदे गटाच्या खासदाराने गडकरी यांच्यासाठी साकडे घातल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. ते माहूर येथील कार्यक्रमात बोलत होते.
नुकतेच केंद्रीतील भाजपा सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत. या काळात सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून नितीन गडकरी यांचेच नाव आघाडीवर घेतलं जाते. पक्षातील नेत्यांसह विरोधी पक्षात देखील त्यांच्या कामाचे कौतुक करणारे कमी नाहीत. यात शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांचे देखील नाव आहे. आज माहूर येथे स्कायवॉकच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी खा. पाटील यांनी नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. त्यांच्या काळात देशात झालेल्या चकचकीत रस्ते पाहून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलसा मिळाला आहे. ऐवढेच नाही तर साधा रिक्षावाला देखील त्यांचे नाव घेतो. असा माणूस देशाच्या प्रधानमंत्री व्हावा. त्यांच्या रूपाने एक मराठी माणूस प्रधानमंत्री पदी लाभावा. यासाठी रेणुका मातेला साकडे घातल्याचे खा. पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले. शिंदे गट - भाजपा राज्यात सत्तेत आहेत, यामुळे खा. पाटील यांच्या या वक्तव्याने नवीन चर्चा सुरु झाली आहे.
वर्षभरात काम संपवा, गडकरी यांच्या कडक सूचना
५१ कोटींच्या या स्कायवॉकचे काम करण्यास १८ महिने कशाला दिले हे मला समजले नाही. हे काम वर्षभरात पूर्ण करा मी एक वर्षाने मातेच्या दर्शनासाठी पुन्हा येईन तेव्हा स्कायवॉकने गडावर जाईल, अशी कडक सूचना केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यास यावेळी दिली.