चाॅकलेट नको, मला सॅनिटायझर हवे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:20 AM2021-02-09T04:20:26+5:302021-02-09T04:20:26+5:30
नांदेड : जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होऊन दोन आठवडे झाले असून, अद्याप शाळेतील विद्यार्थी संख्या वाढली ...
नांदेड : जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होऊन दोन आठवडे झाले असून, अद्याप शाळेतील विद्यार्थी संख्या वाढली नाही. एकीकडे कोरोनाचे भय, तर दुसरीकडे शिक्षणाची ओढ अशा द्विधा स्थितीत विद्यार्थी असून पालकांमध्ये गोंधळलेले वातावरण आहे. ११ महिन्यांपासून घरातच बसून ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांचा मात्र शाळेत जाण्याचा हट्ट सुरू आहे, तर पालकांनाही तो हट्ट पुरवावा लागत आहे. अशा वेळी आपल्या मुलाला शाळेत पाठविताना सॅनिटायझर सोबत दिले जात आहे. मुलेही आता मला चाॅकलेट नको, सॅनिटायझर हवे, असे म्हणत आहेत. त्यामुळे बाजारात सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. सध्या पाचवी ते आठवीचे ३२ टक्के विद्यार्थी शाळेत जात असून, ही उपस्थिती अत्यल्प आहे. हळूहळू विद्यार्थी संख्या वाढत आहे.
चाैकट -
शाळा सुरू झाल्या असल्या, तरी पूर्वीसारखे मनासारखे वातावरण राहिले नाही. कोरोनामुळे ही परिस्थिती आली आहे. कोरोनाची भीती कायम असल्याने काळजी घ्यावी लागत आहे. दररोज सॅनिटायझर व मास्क सोबत आणावे लागत आहे. स्कूलबसमधून सध्या शाळेत जात नाही, तर वडीलच शाळेत नेऊन सोडतात. शाळेत विद्यार्थ्यांना अंतराने बसविण्यात येत असून, शिक्षकांचे लक्ष आहे.
- ओंकार वाघमारे, सातवीतील विद्यार्थी
चाैकट -
शाळेत गेल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान मोजण्यात येत असून, मगच प्रवेश दिला जात आहे. आमच्या शाळेत सॅनिटायझर मोफत दिले जात असले, तरी मी घरून एक बाटली सोबत घेऊन येत आहे. आई, वडीलही आवर्जून सॅनिटायझरविषयी सूचना देत आहेत. त्यामुळे सॅनिटायझरची आवश्यकता भासत आहे.
- संग्राम लोखंडे, सातवीतील विद्यार्थी.
चाैकट -
मागील दहा, बारा महिन्यांपासून घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेऊन कंटाळा आला आहे. कधी एकदाचे शाळेत जावावे असे झाले होते. आता शाळा सुरू झाल्या असून, जाताना दररोज स्कूलबॅगमध्ये सॅनिटायझरची बाटली टाकावी लागत आहे. एकवेळेस टिपीन नसले तरी चालेल; पण सॅनिटायझर सोबत हवे.
- सुमुख फुलारी, दहावीतील विद्यार्थी
चाैकट -
जिल्ह्यातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या असून, त्यादृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सर्व मुख्याध्यापकांना कोरोनाविषयक नियम पाळण्याच्या सूचना दिल्या असून, शाळेत प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान मोजण्यात येत असून मास्कशिवाय प्रवेश दिला जात नाही. एकही विद्यार्थी कोरोनाबाधित आढळला नाही.