वडील नाहीत, आई करते शिवणकाम; पैशांअभावी थांबलेला वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग अखेर मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 08:01 PM2022-12-13T20:01:25+5:302022-12-13T20:02:11+5:30

श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीने केली लाखमोलाची मदत

No father, mother did sews; Student of Nanded Open the path of medical education which is stopped due to lack of money | वडील नाहीत, आई करते शिवणकाम; पैशांअभावी थांबलेला वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग अखेर मोकळा

वडील नाहीत, आई करते शिवणकाम; पैशांअभावी थांबलेला वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग अखेर मोकळा

googlenewsNext

- मारोती चिलपिपरे
कंधार (जि.नांदेड) :
केवळ पैशांअभावी थांबलेला विद्यार्थ्याचा वैद्यकीय अभ्यासक्रमाचा प्रवेश अखेर एका शिक्षण संस्थेने केलेल्या १ लाख रुपयांच्या मदतीमुळे सुकर झाला आहे. ही मदत विद्यार्थ्यासाठी लाखमोलाची ठरली आहे. श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी असे मदत करणाऱ्या संस्थेचे नाव आहे.

लोहा तालुक्यातील लक्ष्मीकांत चंद्रकांत कहाळेकर हा होतकरू विद्यार्थी. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्याने, आईने शिवणकाम करून त्याला शिकविले. लक्ष्मीकांत यानेही मन लावून वैद्यकीय प्रवेशासाठीची तयारी केली. खासगी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी त्याची निवड झाली. मात्र, केवळ पैसे नसल्याने हा प्रवेश थांबला होता. पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, येथील व्यावसायिक शिवा मामडे यांनी ही बाब श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांना सांगितली. प्रा.धोंडगे यांनी क्षणाचाही विलंब न करता लक्ष्मीकांत कहाळेकर याच्या वैद्यकीय प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले. सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना मदत करून आधार देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी दिलेला शब्दही पूर्ण केला. येथील छत्रपती शंभुराजे इंग्लिश स्कूल येथे १२ डिसेंबर रोजी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे सचिव माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे यांच्या हस्ते लक्ष्मीकांत कहाळेकर यास १ लाख रुपयांची मदत सुपुर्द करण्यात आली. यावेळी लक्ष्मीकांतची आई स्वाती कहाळेकर, संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव पेठकर, प्राचार्य डॉ.अशोक गवते, डॉ.गिरमाजी पगडे, शिवाजी मुंडे, मलकुअप्पा शेट्टे, मुख्याध्यापक दिलीप बोधगिरे, संभाजी उंद्रटवाड, हरिहर चिवडे, उपमुख्याध्यापक आढाव, प्रा.पांडुरंग पांचाळ. प्रा.उमेश पुजारी, प्रा.प्रदीप गरुडकर, प्रा.सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते.

केवळ एक गुण कमी मिळाला...
लक्ष्मीकांत चंद्रकांत कहाळेकर याने वैद्यकीय प्रवेशाची जिद्दीने तयारी केली. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी त्याला केवळ एक गुण कमी मिळाला आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी त्याची निवड झाली होती. खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी पैशांची निकड भासत असल्याने त्याचा प्रवेश थांबला होता. मात्र, श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या मदतीने त्याचा वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: No father, mother did sews; Student of Nanded Open the path of medical education which is stopped due to lack of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.