मराठवाड्यात नाही 'एसडीआरएफ'चे पूर्णवेळ पथक; 'गोल्डन अवर'मध्ये मदतीसाठी लागतो वेळ
By प्रसाद आर्वीकर | Published: June 14, 2024 01:10 PM2024-06-14T13:10:50+5:302024-06-14T13:11:31+5:30
केवळ पावसाळ्यात नियुक्ती; 'गोल्डन अवर'मध्ये मदतीसाठी धुळे, पुण्याहून करावे लागते पथकास पाचारण
नांदेड : राज्य आपत्ती निवारण बलाची स्वतंत्र तुकडी मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात नसल्याने पावसाळा वगळता इतर वेळी निर्माण झालेल्या आपत्ती काळात मदत पुरविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागते. गोल्डन अवरमध्ये मदत न मिळाल्याने अनेक जीव गमाविण्याचा धोका निर्माण होतो. तेव्हा राज्य आपत्ती निवारण बलाची स्वतंत्र तुकडी पूर्णवेळ कार्यरत ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण बलाच्या (एनडीआरएफ) अंतर्गत राज्य आपत्ती निवारण बल कार्यरत असते. राज्यात कुठेही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या जवानांमार्फत तातडीने मदतकार्य केले जाते. त्यामुळे आपत्ती काळामध्ये अनेक जीव वाचू शकतात. संपूर्ण मराठवाडा विभागासाठी पावसाळ्यामध्ये एसडीआरएफची केवळ एक तुकडी नियुक्त केली जाते. आपत्ती केव्हाही सांगून येत नाही. त्यामुळे मराठवाड्यासाठी एसडीआरएफची स्वतंत्र पूर्णवेळ तुकडी नियुक्त करणे गरजेचे झाले आहे. दुसरीकडे विदर्भात नागपूर आणि धुळे या दोन ठिकाणी एसडीआरएफची स्वतंत्र तुकडी कार्यरत आहे; परंतु मराठवाड्यात आपत्ती निवारण बलाची तुकडी नसल्याने वेळेत मदत उपलब्ध होत नाही. परिणामी अनेक जीव गमवावे लागतात. तेव्हा मराठवाड्यासाठी एसडीआरएफची तुकडी पूर्णवेळ कार्यरत ठेवावी, अशी मागणी होत आहे.
राज्यात बारा ठिकाणी एसआरपीएफ केंद्र
मुंबई, पुणे, दौंड, सोलापूर, जालना, अमरावती, नागपूर, हिंगोली, धुळे, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, कोल्हापूर या १२ ठिकाणी राज्य राखीव बलाचे प्रशिक्षण केंद्र आहे. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर, गोंदिया आणि कोल्हापूर या ठिकाणी राखीव बलाच्या तीन तुकड्या ठेवल्या आहेत. राज्य राखीव पोलिस बलातील जवानांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देऊन राज्य आपत्ती निवारण बलाची तुकडी कार्यरत केली जाते. विदर्भातील नागपूर आणि धुळे या ठिकाणी एसडीआरएफची तुकडी कार्यरत आहे. मराठवाड्यासाठीही छत्रपती संभाजीनगर, हिंगोली किंवा जालना येथे एसडीआरएफची पूर्णवेळ तुकडी कार्यरत करणे सोयीचे होऊ शकते.
मदतीसाठी लागतात ७ ते १० तास
पावसाळा वगळता इतर काळात मराठवाड्यामध्ये आपत्ती परिस्थिती निर्माण झाली तर मदतकार्य मागविण्यासाठी किमान ८ ते १० तास लागतात. धुळे येथून एसडीआरएफची टीम दाखल होण्यासाठी ८ तास तर पुणे येथून एनडीआरएफची टीम दाखल होण्यासाठी किमान १० तास लागतात. आपत्ती काळात गोल्डन अवर असलेल्या पहिल्या एक तासात मदत मिळाली तर अनेक जीव वाचू शकतात.
एका तुकडीत ३५ जवान
राज्य आपत्ती निवारण बलाच्या एका तुकडीमध्ये एक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, दोन चालक आणि ३० जवान अशा ३५ जणांचा समावेश असतो.
२८ जणांचे वाचविले होते जीव
मागील वर्षी पावसाळ्यात मराठवाड्यासाठी नियुक्त केलेली एसडीआरएफची टीम नांदेड येथे मुक्कामी होती. या पथकातील जवानांनी मुदखेड, अर्धापूर, कासारखेडा, माहूर आदी ठिकाणी बचाव कार्य करून २८ जणांना पुरातून बाहेर काढले होते. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाला बाहेर काढून त्याचा जीव वाचविण्याचे मोलाचे काम एसडीआरएफच्या जवानांनी केले होते.