ना मानधन, ना सोयीसुविधा, रेल्वेच्या पार्सल विभागातील ३०० कामगारांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:22 AM2021-09-14T04:22:30+5:302021-09-14T04:22:30+5:30
नांदेड- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातंर्गत पार्सल विभागात सुमारे ३०० कामगार काम करीत आहेत. या कामगांराना रेल्वे विभागाकडून कुठलाही ...
नांदेड- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातंर्गत पार्सल विभागात सुमारे ३०० कामगार काम करीत आहेत. या कामगांराना रेल्वे विभागाकडून कुठलाही मोबदला दिला जात नाही, याशिवाय सोयीसुविधाही पुरविल्या जात नसल्याने कामगारांचे हाल होत आहेत. सोयी-सुविधा मिळण्यासाठी कामगारांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अशि्न वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार प्रतापराव चिखलीकर, खासदार इम्तियाज जलील, खासदार संभाजी राजे यांच्याकडे दाद मागितली. प्रत्येकाने केवळ आश्वासन देऊन कामगारांची बोळवण केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय कार्यालय नांदेडला या कार्यालयाचे क्षेत्र मनमाडपर्यंत आणि सिकंदराबादपर्यंत आहे. नांदेड रेल्वे स्टेशनवर दररोज ८६ रेल्वे गाड्या ये-जा करीत असतात. याशिवाय मालगाड्याही धावतात. या रेल्वेगाड्यातील मालाची चढ-उतार करणे, दुचाकी गाड्या चढविणे, उतरविणे यासाठी रेल्वे स्टेशनवर पार्सल विभाग आहे. या विभागात जवळपास २० कामगार असून, हा आकडा विभागातंर्गत ३००च्या घरात आहे. काही जणांची तिसरी पिढी यामध्ये आली. मागील काही महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाच्या मार्फत प्रत्येक कामाचे खाजगीकरण केले जात आहे. नांदेड रेल्वे डिव्हीजनतंर्गत रेल्वे पार्सल विभागात बाहेरगावी पाठविण्यात येणाऱ्या दुचाकी पॅकिंगचा ठेका प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आला. एकाच ठेकेदाराला औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि नांदेड रेल्वे स्टेशनचा ठेका देण्यात आला. या ठेकेदाराच्याही धमक्यांना सामोरे जावे लागत आहे. याच पद्धतीने रेल्वेच्या डब्यात माल चढविणे, उतरविणे व पार्सल कायार्लयाच्या हद्दीत सामानाची हाताळणी करण्याचे कामही ठेकेदाराला देण्यात येईल, अशी भाषा वापरली जाते असा आरोप आहे.
नांदेड डिव्हीजनंतर्गत येणारे ३०० कामगार आज हलाखीचे जीवन जगत आहेत. ज्यांचा माल आहे, दुचाकी आहे, अशांकडून आम्ही काही पैसे आकारतो, रेल्वे विभाग आम्हाला कुठलेही मानधन, सोयीसुविधा पुरवित नसल्याची खंत रेल्वे पार्सल विभागातील हमाल व माथाडी संघटनेचे मारोती कुमार (मोघेकर) यांनी व्यक्त केली. काही वर्षांपूर्वी रेल्वेतील कुलींना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात आला होता, त्याच धर्तीवर आम्हालाही दर्जा देण्यात यावा, मानधन देण्यात यावे, इतर सोयीसुविधा देण्याची मागणी आमची आहे, याबाबत आम्ही उपरोक्त सर्व मान्यवरांचा भेटून त्यांचे लक्ष वेधले, अशी माहितीही मोघेकर यांनी दिली. यासाठी सर्वश्री गोपाळराव माळगे, देविदास नामेवार, बन्सी माळगे, शेख इम्तियाज शेख इस्माईल, इस्माईल शेख सुलेमान, शेख अक्रम शेख हुसेन, बाळू नामेवार, अनिल सातपुते, डेविड नामेवार, अभिषेक माळगे, योगेश कांबळे, नसीर अहेमद, आकाश नामेवार, धनराज जाधव, अजय राठोड, वैभव सोनकांबळे आदीही पाठपुरावा करीत आहेत.