उर्ध्व पैनगंगेच्या पाणलोट क्षेत्रात प्रकल्प नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:12 AM2018-05-23T00:12:45+5:302018-05-23T00:12:45+5:30
अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
नांदेड : पूर्ण क्षमतेने भरणाऱ्या जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी अडविल्यामुळे मागील काही वर्षांत हे धरण फार कमी वेळा पूर्ण क्षमतेने भरते. उर्ध्व पैनगंगेची अशी अवस्था टाळण्यासाठी त्याच्या पाणलोट क्षेत्रात नव्याने सिंचन प्रकल्प उभारू नका, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मूळ मंजुरीनुसार इसापूर व सापळी या ठिकाणी सिंचन प्रकल्प उभारला असून, इसापूर धरणापासून निघणारा डावा कालवा ८४ कि.मी.चा, तर उजवा कालवा १७७ कि.मी. लांबीचा आहे. त्यासोबतच सापळी धरणाचा ६ कि.मी.चा पूरक कालवा निर्माण केला आहे. १९६८ मध्ये मान्यता दिलेल्या मूळ आराखड्यात ११९५ द.ल.घ.मी. पाणीसाठा अपेक्षित होता. मात्र, धरणाच्या वरील बाजूचा पाणी वापर वाढल्यामुळे १०८४ द.ल.घ.मी. पाणी उपलब्ध झाले. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या वर पाणी साठवत गेले, तर इसापूर आणि सापळी धरणामुळे निर्माण होणारे सिंचन क्षेत्र ६,४०,००० हेक्टरपर्यंत कमी होईल़ त्यामुळे हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्याचा सिंचन अनुशेष वाढेल. धरणावर आधारित शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल. त्यामुळे प्रकल्पावरील खर्च व सद्य:स्थितीचा विचार करता उर्ध्व भागात प्रकल्पासाठी कुठल्याही प्रकारचे पाणी उपलब्ध करून न देण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
प्रकल्पावरील खर्च व सद्य:स्थितीचा विचार करता उर्ध्व भागात प्रकल्पासाठी कुठल्याही प्रकारचे पाणी उपलब्ध करून न देण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.