सहस्त्रकुंड धबधब्यावर ‘ नो सेल्फी’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:59 AM2018-07-15T00:59:09+5:302018-07-15T00:59:36+5:30
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील हिमायतनगर तालुक्यात असलेला सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक येतात़ काही जण धबधब्याचे मनोहारी दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी प्रयत्नशील असतात़ परंतु, काही हौशी पर्यटक जीव धोक्यात घालून सेल्फीचा प्रयत्न करतात़ अशाप्रकारे सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे़ त्यामुळे यापुढे सहस्त्रकुंड धबधब्यावर सेल्फीला बंदी घालण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील हिमायतनगर तालुक्यात असलेला सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक येतात़ काही जण धबधब्याचे मनोहारी दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी प्रयत्नशील असतात़ परंतु, काही हौशी पर्यटक जीव धोक्यात घालून सेल्फीचा प्रयत्न करतात़ अशाप्रकारे सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे़ त्यामुळे यापुढे सहस्त्रकुंड धबधब्यावर सेल्फीला बंदी घालण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत़
पावसाळा सुरु होताच राज्यभरात धबधब्याच्या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते़ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेला सहस्त्रकुंड धबधबाही त्याला अपवाद नाही़ या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात़ या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा कठडे उभारण्यात आले आहेत़ परंतु, अनेक पर्यटक जीव धोक्यात घालून कठडे ओलांडतात़ काही हौशी तरुण सेल्फी घेण्यासाठी वाट्टेल तो प्रयोग करतात़ त्यातून दरवर्षी या ठिकाणी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो़ काही दिवसांपूर्वीच सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात दोघे जण धबधब्यात पडले होते़ जीवरक्षक दल व आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचला होता़ सध्या सहस्त्रकुंड धबधबा प्रवाही झाला असून यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी धबधब्याजवळ सेल्फी घेण्यास बंदी घातली आहे़ पर्यटकांनी पाण्यात उतरु नये, वाहत्या पाण्याजवळ जावू नये, धबधबा पाहण्यासाठी असलेल्या पादचारी पुलाचा पर्यटकांनी वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे़
---
अशी घ्या खबरदारी...
पर्यटकांनी पाण्याच्या प्रवाहात उतरु नये़ धबधब्याजवळ जावून सेल्फी घेवू नये़ धबधब्यात मोठे व खोल कुंड असल्याने पर्यटकांनी आत उतरुन पोहण्याचे धाडस करु नये़ सोबतचे मुले व वयोवृद्ध व्यक्तींना धबधब्याजवळ जावू देवू नये़ धबधबा पाहण्यासाठी माहीतगार सोबत ठेवावा़