पाणी नाही पण मृत्यूशी गाठ! तहानभुकेने व्याकूळ वयस्कर बिबट्याचा शिवारात शाॅक लागून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:05 IST2025-02-06T15:04:18+5:302025-02-06T15:05:22+5:30

हिमायतनगरातील चिंचोर्डी जंगलातील घटना

No water but a chance to die! An elderly leopard, suffering from thirst, dies of shock | पाणी नाही पण मृत्यूशी गाठ! तहानभुकेने व्याकूळ वयस्कर बिबट्याचा शिवारात शाॅक लागून मृत्यू

पाणी नाही पण मृत्यूशी गाठ! तहानभुकेने व्याकूळ वयस्कर बिबट्याचा शिवारात शाॅक लागून मृत्यू

हिमायतनगर : तालुक्यातील चिंचोर्डी शिवारात पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, वनविभागाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. हिमायतनगर तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याने चांगल्या प्रकारे सागवान आणि अन्य मौल्यवान झाडे असून, मोठ्या प्रमाणात जंगल अस्तित्वात आहे. या जंगलात बिबट्याच्या वास्तव्यामुळे भीतिपोटी चोरटेही जंगलाकडे फिरकेनाशी झाले आहेत.

भुकेने व्याकूळ बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी फिरत असताना, नाल्याच्या कडेला एका झाडावर वानरांचा कळप दिसला. त्याचक्षणी त्याने झाडावर चढून एका वानराच्या पिल्लास भक्ष्य केले. तेच भक्ष्य जबड्यात पकडून, बिबट्या झाडावरून खाली उतरत असताना, त्याचा झाडाशेजारी लागून असलेल्या ११ केव्ही विजेच्या तारेला स्पर्श झाला. बिबट्यास विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सध्या जंगलातील सर्वच ठिकाणांच्या नैसर्गिक पाणवठ्याचे बाष्पीभवन झाले असल्याने वन्य प्राण्यांना जंगलात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. त्याकरिता वनविभागाने पाणवठे तयार करणे गरजेचे आहे. प्राथमिक स्वरूपात या बिबट्याचा मृत्यू हा विजेचा शॉक लागून झाला, असे सांगण्यात येते आहे, परंतु जंगलातील ए ग्रेडचा प्राणी हा बिबट्या असल्याने, या बिबट्याच्या मृत्यूचे कारण शोधणे अतिशय गरजेचे असून, वरिष्ठांनी या गंभीर बाबींकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वन्यप्रेमी जनतेतून केली जात आहे.

भक्ष्य केलेल्या वानराच्या पिल्लाचाही मृत्यू
बिबट्याने ज्या वानराच्या पिल्लाला भक्ष्य केले होते, त्या वानराच्या पिल्लाचाही मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, जिल्हा उपवन संरक्षक केशव वाबळे, सहायक उपवनसंरक्षक ठाकूर, वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी अमोल कदम, वनरक्षक वानोळे, वनमजूर शेख अहेमद हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मयत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.योगेंद्र येवतीकर, डॉ.उमेश सोनटक्के यांना पाचारण करण्यात आले. शवविच्छेदनानंतर अंतिमसंस्काराचा सोपस्कार स्थानिक वनविभागाने पूर्ण केला आहे.

Web Title: No water but a chance to die! An elderly leopard, suffering from thirst, dies of shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.