२६ दिवसांपासून निर्जळी, टँकरचा आर्थिक भुर्दंड; संतप्त नागरिक धडकले जिल्हा कचेरीवर
By श्रीनिवास भोसले | Published: May 18, 2024 09:59 PM2024-05-18T21:59:04+5:302024-05-18T21:59:32+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून भागात पाणीपुरवठा करण्याचे दिले आश्वासन
नांदेड: शहरातील लगत असलेल्या वाडी बु.हद्दीत गेल्या २६ दिवसांपासून निर्जळी आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून वाडी बु.भागात पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.
जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून वाडी बु.ची ओळख आहे. शहरानजीक असल्यामुळे झपाट्याने या भागात लोकवस्ती वाढत आहे. ग्रामपंचायतीला महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर वाडीचा पाणीपुरवठाही बंद करण्यात आला. गेल्या २६ दिवसांपासून वाडी भागात नळाला थेंबभर पाणी आले नाही.
या भागातील नागरिक नियमितपणे पाणीपट्टी भरत असताना मनपाने पाणीपुरवठा खंडित केल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. हजारो रुपये मोजून टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर टँकरसाठी पैसे नसलेल्या नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे वाडी बु.भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी वाडी ग्रामपंचायतीकडे असलेली थकबाकी वसूल करण्याबाबत मनपाशी चर्चा करणार असून सोमवारपासून या भागाला पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी एस.एम.भांगे, सागर मेदकर, प्राचार्य राम जाधव, डॉ.दिलीप शिंदे, एस.व्ही.नळगे, पवन सगरळे, सूरज सगरळे, मोहित मेश्राम, योगेश कटके, अमोल गवळी, उषाताई मेदकर, सुनीता दासरे यांची उपस्थिती होती.