हा मल्टीस्टारर नाही, हॉरर सिनेमा : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 07:13 PM2020-01-27T19:13:25+5:302020-01-27T19:14:16+5:30
सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली
नांदेड : हे सरकार म्हणजे मल्टीस्टार सिनेमा नसून हॉरर सिनेमा आहे़ तो किती दिवस पहायचा हे जनताच ठरवील़. परंतु हा हॉरर सिनेमा लवकरच बंद होणार असल्याची टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनी राज्यातील सरकार हे मल्टीस्टारर सिनेमा असल्याचे वक्तव्य केले होते़ त्यांच्या या वक्तव्याचा फडणवीस यांनी याप्रकारे सोमवारी समाचार घेतला.
नांदेडात चांदोजी पावडे मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते़ फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी संविधानाप्रमाणे काम करू, असे जर लिहून दिले असेल तर शिवसेना ही यापूर्वी संविधानाप्रमाणे काम करीत नव्हती किंवा सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली हे दोन मुद्दे असू शकतात़ अशी टोकदार टीकासुद्धा फडणवीस यांनी यावेळी केली.
तीनचाकी रिक्षा सरकारला मर्यादा
देशाच्या इतिहासात युतीत लढल्यानंतर सत्ता न स्थापन करता दुसऱ्यासोबत घरोबा केल्याची ही पहिलीच घटना आहे़ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकार तीनचाकी रिक्षा असल्याचे म्हणत आहेत़ रिक्षा हे गरिबाचे वाहन आहे़ त्याबद्दल आदरच आहे़ परंतु रिक्षाने नांदेडवरून मुंबईला जाता येत नाही़ त्यासाठी बुलेट ट्रेनच लागते़ कारण रिक्षाला मर्यादा आहे़ त्याचप्रमाणे तीनचाकी रिक्षा सरकारलाही विकासाला मर्यादा येणार आहेत़ असेही फडणवीस यावेळी म्हणाले.