प्रशिक्षणास गैरहजर कर्मचाऱ्यांंना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 01:04 AM2018-12-19T01:04:22+5:302018-12-19T01:06:43+5:30
येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्य पदांसाठी होत असलेल्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणा-या अधिकारी- कर्मचा-यांना जिल्हाधिका-यांनी नोटीस बजावली आहे.
नांदेड : येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्य पदांसाठी होत असलेल्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणा-या अधिकारी- कर्मचा-यांना जिल्हाधिका-यांनी नोटीस बजावली आहे.
गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्य पदासाठी २८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी नांदेडसह औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी व चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचा-यांना १४ डिसेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात आले. शहरातील श्री गुरूग्रंथ साहिब भवन येथे झालेल्या या प्रशिक्षणास उपरोक्त सर्व जिल्ह्यांतील अप्पर जिल्हाधिकारी, सर्व अतिरिक्त पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सर्व क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष आदींची उपस्थिती होती. या प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, क्षेत्रीय अधिकारी तसेच इतर अधिकारी, कर्मचा-यांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गैरहजर असलेल्या अधिकारी, कर्मचा-यांनी आपआपल्या जिल्हाधिका-यांमार्फत खुलासा सादर करावा, असेही कळविण्यात आले आहे. गैरहजेरीचा खुुलासा सादर न करणा-या अधिकारी, कर्मचा-याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
१४ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबतचे मार्गदर्शन केले तर निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याबाबतचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केले. मतदानप्रक्रिया आणि मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी उपस्थितांना माहिती दिली. गुरुद्वारा बोर्ड निवडणुकीचे दुसरे प्रशिक्षण आणि निवडणूक साहित्य वाटप २५ डिसेंबर २०१८ रोजी गुरु ग्रंथसाहिब भवन येथे होणार आहे.
बोर्डाच्या तीन जागांसाठी २६ उमेदवार
गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्य पदासाठी २६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुकीत एकूण १२ हजार ७१४ मतदार आहेत. यात ५ हजार ८४३ महिला मतदार तर ६ हजार ८७१ पुरुष मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यासह औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बीड, लातूर या संपूर्ण जिल्ह्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना व जीवती या तालुक्यांत मतदार मतदान करु शकणार आहेत. २८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.