चार उमेदवारांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:39 AM2019-04-09T00:39:46+5:302019-04-09T00:43:29+5:30
लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात रिंगणात असलेल्या १४ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील आपला निवडणूक प्रचार खर्च सादर न केल्याने या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
नांदेड : लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात रिंगणात असलेल्या १४ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील आपला निवडणूक प्रचार खर्च सादर न केल्याने या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचे चित्र उमेदवारी मागे घेतल्यानंतर २९ मार्च रोजी स्पष्ट झाले. नांदेड लोकसभा मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांकडून होणारा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत उमेदवारांना ७० लाख रुपये खर्चापर्यंतची मर्यादा आहे. हा खर्च वेळोवेळी सादर करावा लागणार आहे. उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी ५ एप्रिल रोजी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान १४ उमेदवारांपैकी समाजवादी पार्टीचे अब्दुल समद, अपक्ष उमेदवार शिवानंद देशमुख, रणजित देशमुख आणि अशोक चव्हाण या चार उमेदवारांनी पहिल्या तपासणीत निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या खर्चाचे विवरण निवडणूक विभागाकडे सादर केलेच नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिाित्व कायदा १९५१ च्या (७७) कलमान्वये या चार उमेदवारांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये खर्च सादर करण्यात आला नाही, याबाबत विचारणा केली आहे.
दरम्यान, उमेदवारांनी प्रचारादरम्यान केलेल्या खर्चाची दुसरी तपासणी १० एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे या दुसऱ्या तपासणीत तरी हे उमेदवार आपला खर्च सादर करतील का? याकडे लक्ष लागले आहे.
खर्चाचा हिशेब जुळविताना कसरत
- निवडणूक आयोगाने निवडणुकीत प्रत्येक गोष्टीचे दर निश्चित केले आहेत़ त्यामध्ये जेवणातील पदार्थ,वाहने, प्रचाराचे साहित्य यातील प्रत्येक बाबींचा समावेश आहे़ त्यामुळे उमेदवारांना खर्चाचा हिशेब सादर करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे़ अवास्तव खर्च टाळण्यासाठी प्रत्येक उमेदवार कटाक्षाने लक्ष ठेवून आहे़ आचारसंहिता पथकही उमेदवार कुठे अन् किती खर्च करीत आहेत, याची तपासणी करीत आहे़ त्यामुळे उमेदवार अन् त्यांच्या कार्यकर्त्यांची खर्च जुळविताना चांगलीच दमछाक होत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे़
- भाजपाचे माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे खा़अशोकराव चव्हाण व डी़पी़सावंत यांची तक्रार केली आहे़ खा़ चव्हाण यांनी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेडातील सभा रद्द झाल्याचे आचारसंहिता भंग करणारे विधान केले असल्याचा आरोप केला़ तर डी़पी़सावंत यांनी चिखलीकरांच्या विरोधात अशोकराव खरे लीडर तर भाजपाचा उमेदवार दारुचे डीलर असे वक्तव्य केल्याचा आरोप पोकर्णा यांनी केला आहे़ तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे़