कंधारात ईव्हीएम, व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक कामास दांडी मारणाऱ्या चार तलाठ्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 02:42 PM2019-01-12T14:42:45+5:302019-01-12T14:43:57+5:30
दिलेल्या गावात काम करणे आवश्यक असताना चार तलाठ्यांनी गैरहजेरी दर्शवली असल्याचे समोर आले आहे.
कंधार (नांदेड ) : तालुक्यात २११ मतदान केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक दाखविली जात आहेत. त्यासाठी दोन मशीन, पथके कार्यान्वित केली आहेत. दरम्यान, दिलेल्या कामास दांडी मारणाऱ्या चार तलाठ्यांना तहसीलदार संतोषी देवकुळे यांनी नोटीसा बजावल्या आहेत़ त्यामुळे कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
कंधार तालुक्यात सर्व गावात मतदारात जनजागृती व्हावी. यासाठी गाव व विविध स्तरावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी योग्य असे गावनिहाय नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी यंत्रणा सक्रीय करण्यात आली असून प्रत्यक्ष अमंलबजावणी केली जात आहे. गावातील मतदार व व्यक्ती समक्ष प्रात्यक्षिक दाखविले जात आहे. तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालये, व्यापारी, राजकीय पदाधिकारी, बचतगट, अंगणवाडी सेविका आदीनांही प्रात्यक्षिक दाखविण्याचे नियोजन केले आहे.
निवडणुकीचे हे काम अत्यंत संवेदनशील व काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. दिलेल्या गावात काम करणे आवश्यक असताना चार तलाठ्यांनी गैरहजेरी दर्शवली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आपण दिलेल्या कामास जाणीवपूर्वक गैरहजर राहून राष्ट्रीय कामात निष्काळजीपणा केला आहे. असा नोटीसीत उल्लेख केला आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १३४ अन्वये कार्यवाही का प्रस्तावित करण्यात येऊ नये, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. याचा लेखी खुलासा तात्काळ समक्ष सादर करावा, अन्यथा कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असे बजावले आहे.
पेठवडजचे तलाठी हे काम दिलेल्या तारखेला बारूळ, बारूळ कँम्प, धानोराकौठा, शिरूर, राऊतखेडा येथे गैरहजर होते. पानभोसीचे तलाठी हे हाळदा, भूकमारी, काटकंळबा येथे गैरहजर होते. उस्माननगरचे तलाठी हाळदा, भूकमारी, काटकंळबा येथे आणि कंधारचे तलाठी बारूळ, बारूळ कॅम्प, शिरूर, राऊतखेडा, धानोराकौठा, कंधार शहरात विविध ठिकाणी दिलेल्या दिवशी गैरहजर होते़ चार तलाठयांना नोटीसा बजावल्याने संबंधित कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. नोटीसीला तलाठी काय उत्तर देतात. गैरहजर राहण्यास कोणती अडचण सांगत खुलासा सादर करतात, हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.