बिल वसुलीसाठी महावितरणच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:17 AM2021-03-18T04:17:34+5:302021-03-18T04:17:34+5:30
कृषी पंपाची कोट्यवधी रुपयांची बिले शेतकऱ्यांकडे थकली आहेत. कोरोना तसेच सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांना शासनाकडून वीज बिल माफ होईल, अशी ...
कृषी पंपाची कोट्यवधी रुपयांची बिले शेतकऱ्यांकडे थकली आहेत. कोरोना तसेच सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांना शासनाकडून वीज बिल माफ होईल, अशी अपेक्षा आहे; परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही सवलत दिली नाही. मात्र, महावितरणकडून महाऊर्जा अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विशेष सवलतीची संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र, आज शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करत आहे. या अभियानात शेतकऱ्यांना सवलत देण्याबरोबरच त्यातील ३३ टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायतीअंतर्गत खर्च करण्याचाही उपक्रम महावितरण राबवीत आहे.
महावितरणकडून शेतकऱ्यांना विशेष सवलत देऊन थकीत बिल भरण्यासाठी सोनेरी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेऊन आपल्या डोक्यावरील वीज बिलाची थकबाकी दूर करावी, तसेच महावितरणला सहकार्य करावे. काही शेतकरी चालू बिलदेखील भरत नाहीत. त्यामुळे चालू बिल भरण्यासाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
-संतोष वहाणे, मुख्य अभियंता, नांदेड
शासनाकडून वीज बिल माफ करण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे बिल माफ करावे, तसेच कृषी पंपांना सवलतीत वीज उपलब्ध करून देण्यात यावी.
-बालाजी नादरे, शेतकरी
महावितरणकडून ज्याप्रमाणे कृषी पंपाची वीज बिले भरण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे, त्याप्रमाणेच जे शेतकरी नियमितपणे वीज बिल भरणा करतात त्यांना विशेष मोहीम व उपक्रमाद्वारे नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा करावा. जेणेकरून वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.
-नीलेश जोगदंड, शेतकरी
बऱ्याच शेतकऱ्यांना आजपर्यंत महावितरणकडून पैसे भरूनही विज कनेक्शन देण्यात आले नाही. कोटेशन भरूनही वीजपुरवठा करण्यास महावितरणकडून दिरंगाई झाली असेल, तर अशा शेतकऱ्यांच्या कोटेशनची रक्कम व्याजासह परत करून त्यांना मोफत कनेक्शन द्यावे.
-बालाजी काकडे, शेतकरी