नांदेड महापालिकेची केळी मार्केटमधील व्यापाऱ्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:55 AM2018-06-29T00:55:31+5:302018-06-29T00:56:18+5:30
जुन्या नांदेडातील केळी मार्केट येथे असलेल्या २४ गाळेधारकांना दोन वर्षांपासून थकीत भाड्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली असून सात दिवसांत सदर गाळयांचे भाडे भरावे अन्यथा गाळे रिकामे असेही सूचित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जुन्या नांदेडातील केळी मार्केट येथे असलेल्या २४ गाळेधारकांना दोन वर्षांपासून थकीत भाड्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली असून सात दिवसांत सदर गाळयांचे भाडे भरावे अन्यथा गाळे रिकामे असेही सूचित करण्यात आले आहे.
जुन्या नांदेडातील केळी मार्केट येथे एकूण ४४ गाळे आहेत. त्यातील २४ गाळे हे फळ विक्रेत्यांना भाड्याने दिले आहेत. २० गाळे अद्यापही रिकामे आहेत. रिकामे असलेले गाळे भाजीपाला विक्रेत्यांना देण्याबाबत महापालिका धोरण ठरवित आहे. त्याचवेळी दोन वर्षांपासून भाडे थकलेल्या २४ गाळेधारकांना नोटीस बजावली आहे. सदर गाळेधारक हे फळ विक्रेते आहेत.
केळी मार्केट येथून फळमार्केट विमानतळ परिसरातील म्हाळजा येथे दोन वर्षापूर्वी स्थलांतरीत झाले होते. या स्थलांतरानंतर गाळेधारकांनी केळी मार्केट येथील गाळे हे आपल्या ताब्यात ठेवले.
विमानतळ परिसरातील सुरक्षेला धोकादायक असल्याच्या कारणावरुन महापालिकेने म्हाळजा परिसरातील फळ मार्केट हटविले.
फळ तसेच भाजीपाला विक्रेत्यांसाठी जागेचा शोध घेतला जात असताना दुसरीकडे थकीत असलेले भाडे वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने गुरुवारी सदर दुकानांवर नोटीस डकवल्या आहेत. यामध्ये थकीत भाडे हे नवीन दरानुसार भरण्यासही सूचित करण्यात आले आहे. यापूर्वी सदर दुकानांना अडीच हजार रुपये भाडे होते.
आता नव्या दराप्रमाणे गाळेधारकांना ८ हजार रुपये भाडे भरावे लागणार आहेत. या भाडेवाढीस फळ विक्रेत्यांनी विरोध केला आहे. इतके दिवस दुकाने बंद असताना आता नव्या दराप्रमाणे भाडे भरणे शक्य नसल्याचे व्यापाºयांनी म्हटले आहे. पण महापालिकेने आता स्पष्ट भूमिका घेत नव्या दराप्रमाणे भाडे ंआकारणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मनपाकडून या गाळ्यासंदर्भात निश्चितच भूमिका घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गाळेधारक आता हे थकीत भाडे कधी भरतील हा प्रश्न आहे. भाडे न भरल्यास मनपाच्या कारवाईला त्यांना सामोरे जावे लागेल.
---
भागिदारधारकांसाठी अभय योजना
शहरात महापालिकेच्या व्यापारी संकुलामध्ये जे गाळेधारक भागिदारीमध्ये व्यवसाय करतात अशा भागिदारधारकांसाठी महापालिकेने नाव परिवर्तनासाठी अभय योजना घोषित केली आहे. व्यापारी संकुलामध्ये भाडेपट्यावर देण्यात आलेले गाळे व मनपा मालकीच्या जागेमध्ये जे गाळेधारक भागिदारीत व्यवसाय करतात.सदर जागेच्या चालू बाजारभावाप्रमाणे एकूण किमतीच्या २५ टक्के रक्कम मनपात जमा करावी लागणार असून रक्कम जमा केल्यानंतरच नाव परिवर्तन होईल. व्यापारी संकुलामधील गाळेधारकांनी भागिदारी संपुष्टात आल्यानंतर सदर दुकान भागिदाराच्या नावे आल्यास त्याच्या नावे करण्यासाठी अर्ज करावे, असे महापालिकेचे मालमत्ता व्यवस्थापक स. अजितपालसिंघ संधू यांनी कळविले आहे.