सात गटविकास अधिका-यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 01:26 AM2018-03-04T01:26:04+5:302018-03-04T01:26:14+5:30
जलयुक्त शिवार योजनेच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, बिलोली, किनवट, मुखेड, नायगाव आणि नांदेड तालुक्याच्या गटविकास अधिका-यांना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अनुराग पोवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जलयुक्त शिवार योजनेच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, बिलोली, किनवट, मुखेड, नायगाव आणि नांदेड तालुक्याच्या गटविकास अधिका-यांना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत दुसºया टप्प्यात १८३ गावांत ५ हजार ४२४ कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी ८३ कोटी ४६ लाख रुपये लागणार आहेत. या आराखड्यांना विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर ३ हजार ३०१ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ३ हजार ३०१ कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात मंजूर झालेल्या ३८९ कामांची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. विविध विभागांकडून आजघडीला ८७१ कामे सुरू आहेत तर आजतागायत ५३० कामे पूर्ण झाली आहेत. संपूर्ण मराठवाड्याचा विचार करता नांदेड जिल्हा उस्मानाबादनंतर दुसºया क्रमांकावर आहे.
जलयुक्तची कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डोंगरे यांनी लक्ष केंद्रित करताना दरमहा या योजनेच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. झालेल्या कामाची आॅनलाईन माहिती छायाचित्रासह संकेतस्थळावर अपलोड केली जात आहे. मात्र काही तालुक्यांतून या सर्व बाबींना छेद दिला जात असल्याची बाब निदर्शनात आली. वारंवार हा प्रकार होत असल्याने जिल्हाधिकाºयांनी याची दखल घेत सात तालुक्यांच्या गटविकास अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कामातील निष्काळजीपणा, बैठकांना अनुपस्थिती या सर्व बाबींचा खुलासा करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या कारवाईनंतर अधिकाºयांमध्ये खळबळ उडाली असून जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाकडे दुर्लक्ष करणे महागात पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्वाधिक ३ हजार १७६ कामे कृषी विभागाकडून केली जात आहेत. त्याखालोखाल १ हजार ५१७ कामे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येत आहेत. लघुसिंचन विभागही २२९, वनविभाग १७५, सामाजिक वनीकरण १३५, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा ४४, जि.प. लघु पाटबंधारे १३१, पाटबंधारे व्यवस्थापन १, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा ११ आणि यांत्रिकी विभागाकडून ५ कामे प्रस्तावित आहेत. आतापर्यंत जलयुक्त शिवार योजनेतून ५३० कामे पूर्ण झाली असून कृषी विभागाचे २२४, ग्रामपंचायतीचे २९९, लघुसिंचन १, वनविभाग ४ आणि जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची दोन कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेचे ३ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली.जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये २२६ गावांत जलयुक्त शिवारचे ८ हजार २२० कामे पूर्ण करण्यात आली आहेत.