नांदेड जिल्ह्यात हमीभावासाठी आता व्यापारी रडारवर;बाजार समितीने पाठवल्या नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:30 AM2018-02-07T00:30:21+5:302018-02-07T12:25:03+5:30
नाफेडने जिल्ह्यात सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले असून हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी करणा-या व्यापा-यांना बाजार समितीकडून नोटिसा पाठविल्या जात आहेत़ नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीने आतापर्यंत २० व्यापा-यांना नोटिसा पाठविल्या आहेत़
श्रीनिवास भोसले।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नाफेडने जिल्ह्यात सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले असून हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी करणा-या व्यापा-यांना बाजार समितीकडून नोटिसा पाठविल्या जात आहेत़ नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीने आतापर्यंत २० व्यापा-यांना नोटिसा पाठविल्या आहेत़
शासनाने तूर आणि हरभरा खरेदीसाठी नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू केले जात आहे़ जिल्ह्यात आजपर्यंत मुखेड, नांदेड-अर्धापूर, देगलूर, नायगाव, बिलोली, लोहा या ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ तर लवकरच किनवट, भोकर आणि हदगाव येथे तूर खरेदी केंद्र सुरू केले जाणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग आॅफिसर रामप्रसाद दांड यांनी सांगितले़ तूर विक्रीसाठी पीकपेरा नोंद असलेला सातबारा, आधार आणि बँक पासबुकची झेरॉक्स देवून नोंदणी करावी लागत आहे़ नोंदणी केलेल्या शेतक-यांना मॅसेज पाठवून तूर विक्रीसाठी घेवून येण्याचे आवाहन केले जात आहे़
शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या आॅनलाईन पद्धतीमुळे शेतक-यांच्या अडचणी वाढत आहेत़ तर हेक्टरी केवळ १२ क्विंटलची मर्यादा दिली असल्याने निव्वळ तुरीचे उत्पादन घेण्या-या शेतक-यांसमोर हमीभाव मिळविण्याचे संकट उभे राहत आहे़ शासनाकडून सध्या बोनससह प्रतिक्विंटल ५ हजार ४५० रूपये भाव दिला जात आहे़ नाफेडमार्फत ३ हजार ५० रूपये प्रतिक्विंटलने सोयाबीनची खरेदी केली़ खासगी बाजारपेठेतदेखील कमीच भाव होता़ परंतु, आज व्यापाºयांकडून ४ हजार ते ४२०० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे सोयाबीनची खरेदी केली जात आहे़ यामध्ये व्यापा-यांचीच चांदी होणार हे निश्चित आहे़ कोणतीही नोंदणी न करता तूर विक्री केली की लगेच पैसे मिळत असल्याने शेतकरीदेखील खाजगी व्यापाºयांकडेच तूर, चणा विक्री करीत असल्याचे चित्र आहे.
बाजार समितीकडून २० व्यापा-यांना नोटिसा
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीने हमीभावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करणा-या जवळपास वीस व्यापा-यांना नोटिसा बजावल्या आहेत़ शेतक-यांनी हमीभावापेक्षा कमी दराने आपला माल विकू नये तसेच व्यापा-यांनीदेखील हमीभाव देण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सभापती बी़ आऱ कदम यांनी सांगितले़
तालुका कृषी अधिकारी, तालुका उपनिबंधक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांच्या परवानगीशिवाय नॉन एफएक्यू दर्जाचा माल विक्री व खरेदी केला जाऊ नये, असे आवाहन सचिव हरिश्चंद्र देशमुख यांनी केले़ हमीभावापेक्षा कमी भावाने तूर, चणा खरेदी करणा-या व्यापा-यांना नोटिसा देवून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले़ शेतक-यांनीदेखील हमीभाव खरेदी केंद्रावरच आपला माल विकून शासनाच्या हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले़