आता मोबाईलवरच रेल्वे तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:57 AM2018-07-15T00:57:32+5:302018-07-15T00:58:00+5:30
रेल्वे प्रवाशांना आता तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नसून मोबाईल अॅपद्वारे तिकीट काढण्याची सुविधा दक्षिण मध्य रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे़ सदर अॅप १५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांनी दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : रेल्वे प्रवाशांना आता तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नसून मोबाईल अॅपद्वारे तिकीट काढण्याची सुविधा दक्षिण मध्य रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे़ सदर अॅप १५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांनी दिली़
रेल्वे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकी अथवा एटीव्हीएम मशीनसमोर रांगेत थांबूनच तिकीट घ्यावे लागत होते़ त्याचबरोबर स्थानकात येण्यास उशीर झाल्यास मोठ्या रांगेत उभे राहून तिकीट मिळविणे कठीण असल्याने अनेकवेळा विनातिकीट प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत होती़ त्यातच तिकीट निरीक्षक अथवा विशेष पथकाने तपासणी केल्यास दंड अथवा शिक्षेस सामोरे जावे लागत होते़ परंतु, स्मार्ट फोनचा वाढता वापर लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांना मोबाईल अॅपद्वारे कॅश आणि पेपरलेस तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार रेल्वे प्रशासनाने युटीएस नावाचे एक मोबाईल अॅप तयार केले आहे़ या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना मोबाईलवरच तिकीट काढता येणार आहे आणि तेच तिकीट दाखवून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे़
---
असे वापरा ‘युटीएस’
अनारक्षित तिकीट घेवून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी स्मार्ट फोनमध्ये युटीएस नावाचे मोबाईल अॅप डाऊनलोड करून घ्यावे. त्यानंतर स्वत:ची माहिती जसे- आपला मोबाईल क्रमांक, नाव, जन्मतारीख, ओळखपत्र आदी माहिती भरून नोंदणी करावी लागेल़ सुरक्षिततेसाठी पासवर्ड पण देता येईल़ त्यानंतर आर-वॉलेट तयार होईल़ त्यातून तिकिटाचे पैसे द्यायचे आहेत़ या आर- वॉलेटला आॅनलाईन रिचार्ज करता येईल़ शंभर रूपयांपासून ते १० हजार रूपयापर्यंतचे रिचार्जची सुविधा उपलब्ध असल्याचे वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांनी सांगितले़ सदर अॅपच्या माध्यमातून १ ते चार जणांचे सर्वसाधारण तिकीट काढता येवू शकणार आहेत़
---
मोबाईल अॅपचे फायदे
सदर मोबाईल अॅप दक्षिण मध्य रेल्वे झोनमध्ये प्रवास करणाºया प्रवाशांना वापरता येणार असून स्थानकापासून ५ किलोमीटरपर्यंत तसेच रेल्वेस्थानकापासून किमान १५ मीटर दूर अंतरावरून तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ अॅपच्या माध्यमातून सर्वसाधारण, सीजन, फलाट फार्म तिकीट, द्वितीय श्रेणी तिकीट काढता येवू शकते़ परंतु, एकदा काढलेले तिकीट रद्द करता येत नाही़ त्याचबरोबर रेल्वेस्थानकापासून १५ मीटर अंतरापर्यंत सदर अॅपचा उपयोग घेवून तिकीट काढता येत नाही़ त्यामुळे किमान १५ मीटर दूर असणे गरजेचे आहे़ तिकीट तपासणीसांना वेगळे अॅप दिले असून ते त्याद्वारे तिकीट तपासणी करू शकतात़