आता आम्ही शेती करू... 5 एकर जमीन मिळाल्याचा आनंद, पतीच्या आठवणीने वीरपत्नी भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 10:32 PM2019-01-30T22:32:52+5:302019-01-30T22:35:32+5:30
सीमारेषेवर लढत असताना घरातील करता पुरुष गमावल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होतो.
नांदेड - शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून 5 एकर जमीन मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. नांदेड जिल्ह्यातील शहीद संभाजी कदम यांच्या कुटुंबियांना याचा पहिला लाभ मिळाला आहे. काश्मीरच्या सीमेवर तैनात असताना संभाजी कदम शहीद झाले होते. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी म्हणून सरकारच्या निर्णयाप्रमाणे कदम कुटुबीयांना 5 एकर जमिन देण्यात आली.
सीमारेषेवर लढत असताना घरातील करता पुरुष गमावल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. तसेच त्या शहीदाच्या पत्नी आणि मुलांचा सांभाळ हाही चिंतेचा विषय ठरतो. राज्य सरकारने ही बाब लक्षात घेऊनच 28 जून 2018 रोजी महाराष्ट्रातील शहिदांच्या कुटुंबाला 5 एकर शेतीयोग्य जमीन मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. नांदेड जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ अमलबजावणी करून शहीद संभाजी कदम यांच्या परिवाराला 5 एकर शेतीयोग्य सरकारी जमीन 'खरबी' या गावात मोफत दिली आहे. सरकारच्या या योजनेमुळे आपणास 5 एकर जमीन मिळाल्याने कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागलं. आता आम्ही या जमिनीवर शेती करू असे वीरपत्नी शीतल संभाजी कदम यांनी म्हटलंय. तर आपल्या गावातील शासकीय जमीन एका वीरपत्नीला मिळाल्याचा आनंदही गावकऱ्यांनी व्यक्त केला. यापर्वी नांदेड-वाघाला महापालिकेकडून शहीद कदम कुटुबीयांना 11 लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आला आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना नांदेडचे सुपुत्र संभाजी यशवंत कदम यांना वीरमरण प्राप्त झाले होते. 29 नोव्हेंबर 2016 रोजी सीमारेषेवर ते शहीद झाले होते. नांदेडच्या लोहा तालूक्यातील जानापुरी गावचे ते रहिवासी आहेत. त्यांच्यामागे आई-वडील,पत्नी, तीन वर्षाची कन्या आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.