आता उमेदवारांचे अवतण ताई, अक्का, वहिनी गावाकडे कधी येणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:15 AM2021-01-04T04:15:43+5:302021-01-04T04:15:43+5:30
लोहा- ग्रामपंचायत निवडणूक लागल्याबरोबर गाव पुढाऱ्यांना व गावकऱ्यांना आता मात्र त्यांची आठवण आली असून, ‘ताई, अक्का, वहिनी, दादा, ...
लोहा- ग्रामपंचायत निवडणूक लागल्याबरोबर गाव पुढाऱ्यांना व गावकऱ्यांना आता मात्र त्यांची आठवण आली असून, ‘ताई, अक्का, वहिनी, दादा, भाऊ, अण्णा, मामा, मामी गावाकडे कधी येणार? यावेळेस तरी गावी यावंच लागेल, जाण्या-येण्याच्या खर्चाबरोबरच इतरही बंदोबस्त केला जाईल’, असेही सांगितले जात आहे.
लोहा तालुक्यासह जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुकांचा चांगलाच धुरळा उडत असून, ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी पार पडली, अर्ज माघारीची मुदत ४ जानेवारी असून, त्यानंतर उमेदवारांना लगेच चिन्हांचे वाटप होणार आहे. तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या ७७४ जागांची निवडणूक रणधुमाळी सुरु झाली आहे. या जागांसाठी १५ जानेवारीला मतदान आहे. निवडणूक निकालानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असले, तरी मीच सरपंच होणार! अशा अविर्भावात सर्वजण वावरू लागले आहेत. त्यातच या निवडणुकीकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीची पूर्वतयारी म्हणून पाहिले जाऊ लागल्याने तालुका पातळीवरील नेत्यांनी या निवडणुकीत जातीने लक्ष घातले आहे.
तालुक्यातील बहुतांश नागरिक पुणे, मुंबई व इतर शहरांकडे रोजगार किंवा नोकरीच्या निमित्ताने गेलेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झाल्यानंतर हे गावाकडे आलेले ग्रामस्थ पुन्हा शहरात गेले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक उमेदवार असल्याने निवडणूक अटीतटीची होते. त्यामुळे प्रत्येक मतदाराला महत्त्व प्राप्त होते. शहराकडे गेलेले मतदार मतदानासाठी गावाकडे यावेत, यासाठी त्यांना आता गळ घातली जात आहे. मध्यंतरी झालेल्या मन:स्तापाचा फटका या मतदारांकडून बसण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे असे मतदार मतदानासाठी येणार का? हे ही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.