'आता आपण मरणार'; कोरोनाचा त्रास असह्य झाल्याने विलगीकरणातील वृद्धाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 06:35 PM2021-03-27T18:35:22+5:302021-03-27T18:38:38+5:30
corona virus कोरोनामुळे होणारा त्रास सहन न झाल्यामुळे त्यांनी शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली.
नांदेड : कोरोनामुळे आज प्रत्येकजण हैराण झाला आहे. अनेकांना त्यामुळे मानसिक आजारही झाले आहेत. परंतु, कोरोना झाल्यामुळे आपण मरणार, या भीतीने वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कंधार तालुक्यात घडली. लोकडू शामराव कैलासे ( ७३ ) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. रुग्णालयात उपचारासाठी खाटाही मिळेना झाल्या आहेत. त्यातच दररोज संसर्ग मात्र वाढतच आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका हा वृद्धांना असून, अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातच कंधार तालुक्यातील प्रियदर्शनीनगर येथील लोकडू शामराव कैलासे या ७३ वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना विलगीकरणासाठी म्हणून ग्लो ॲन्ड ग्रो या शाळेमध्ये ठेवले होते. परंतु, कोरोनामुळे होणारा त्रास सहन न झाल्यामुळे त्यांनी शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी संतोष कंभरगावे यांच्या माहितीवरुन कंधार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.