रुग्णसंख्या घटतेय, मराठवाड्याचा मृत्युदर मात्र चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:17 AM2021-05-14T04:17:52+5:302021-05-14T04:17:52+5:30
नांदेड : रुग्णवाढीचा दर मराठवाड्यात कमी होत असून, औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यांतील हा दर राज्याच्या दरापेक्षा कमी झाला आहे. ...
नांदेड : रुग्णवाढीचा दर मराठवाड्यात कमी होत असून, औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यांतील हा दर राज्याच्या दरापेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे नांदेडसह मराठवाड्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र असले तरी मृत्युदर मात्र चिंता वाढविणारा आहे. राज्यातील अधिक मृत्युदर असलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये नांदेडसह लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात सर्वाधिक मृत्युदर नंदूरबार जिल्ह्याचा ५.७० टक्के इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडचा मृत्युदर ५.१७ टक्क्यांवर गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.
५ ते ११ मे या आठवड्यात राज्याचा मृत्युदर १.३२ टक्के राहिला आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक मृत्युदर दिसून आला आहे. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. नांदेडमध्ये ५.१७ टक्क्यांवर मृत्युदर गेला आहे, तर लातूर जिल्ह्याचा मृत्युदर २.५४ टक्के इतका असून, राज्यात चौथ्या क्रमांकावर उस्मानाबाद असून, या जिल्ह्याचा मृत्युदर २.३९ टक्के इतका आहे. आरोग्य विभागाने राज्यातील पाच जिल्ह्यांना मृत्युदर कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभागाने राज्यातील पाच जिल्ह्यांना मृत्युदर कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १४ ते २० एप्रिल या कालावधीत नांदेडचा मृत्युदर १.७४ टक्के इतका होता. २१ ते २७ एप्रिल या कालावधीत तो ३.७६ टक्क्यांवर गेला. २८ ते ४ मे या कालावधीत काहींशी घट होत तो ३.३५ टक्क्यांवर राहिला. मात्र, ५ ते ११ मे या कालावधीत हा दर वाढून पुन्हा ५.१७ टक्क्यांवर गेला आहे. काहींशी अशीच स्थिती लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची आहे. त्यामुळे नांदेडसह लातूर आणि उस्मानाबाद या तिन्ही जिल्ह्यांपुढे मृत्युदर रोखण्याचे आव्हान आहे.
चौकट-----------------
पॉझिटिव्हिटी रेटमध्ये परभणी तिसऱ्या क्रमांकावर
राज्याचा सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट २२.५७ टक्के इतका आहे. मात्र, अहमदनगर, बुलढाण्यापाठोपाठ परभणीचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहमदनगरचा रेट सर्वाधिक ३९.५०, बुलढाणा ३७.९१, तर परभणी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३४.१३ टक्के इतका आहे. बीड ३१.१७, जालना २८.६९, हिंगोली २७.९९, तर उस्मानाबादचा पॉझिटिव्हिटी रेट २५.२४ टक्के आहे. या तुलनेत नांदेड आणि औरंगाबादचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. सध्या नांदेडचा पॉझिटिव्हिटी रेट १८.५२ टक्के असून, औरंगाबादचा हाच रेट मराठवाड्यात सर्वात कमी म्हणजे १०.३५ टक्के इतका आहे.
लसीकरणातही मराठवाडा मागे
मागणीच्या तुलनेत अत्यल्प पुरवठा होत असल्याने लसीकरणाची मोहीम रेंगाळली आहे. विशेषत: राज्यात ४५ वर्षांहून अधिकच्या लाभार्थ्यांचे ३०.८१ टक्के लसीकरण झालेले असताना मराठवाड्यातील सर्वच जिल्हे यामध्ये मागे आहेत. जालन्यात ११ मे पर्यंत उद्दिष्टांच्या २२.५२, औरंगाबाद २१.९२, नांदेड २१.६९, लातूर २१.६१, परभणी २०.७९, बीड- २०.६९, उस्मानाबाद- २०.३५, तर हिंगोली जिल्ह्यात १३.६८ टक्के ४५ वर्षांहून अधिकच्या लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे.
कोट-------------
नांदेड जिल्ह्यात ऑक्सिजन रेमडेसिविरसह सर्व आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. मागील काही दिवसांत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे. मात्र, अनेक रुग्ण ऑक्सिजन लेवल ४०-५० टक्क्यांवर गेल्यानंतर उपचारासाठी दाखल होत असल्याने मृत्युदर वाढल्याचे दिसते. हा दर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. पुढील आठवड्यापर्यंत या दरात निश्चित कमी होईल. - डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नांदेड.