शौचालय बांधकामात नांदेड जिल्हा राज्यात अव्वल, ७ महिन्यात बांधले तब्बल १ लाख १२ हजार शौचालये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 12:12 PM2017-11-16T12:12:57+5:302017-11-16T12:17:34+5:30
नांदेड : जिल्ह्यात ग्रामीण भागातून गेल्या सात महिन्यांमध्ये तब्बल १ लाख १२ हजार २०३ शौचालय बांधून नांदेड जिल्ह्याने राज्यात ...
नांदेड : जिल्ह्यात ग्रामीण भागातून गेल्या सात महिन्यांमध्ये तब्बल १ लाख १२ हजार २०३ शौचालय बांधून नांदेड जिल्ह्याने राज्यात अव्वलस्थान मिळविले आहे. या काळात योजनेला गती देण्यासाठी जिल्हाभर राबविण्यात विविध उपक्रम राबवून त्याची अंमलबजावणी करण्यात आली.
शौचालय बांधकामात मागे असलेल्या नांदेड जिल्ह्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी विविध मिशन आणि उपक्रम राबवून शौचालय बांधकामाची गती वाढविली आहे. याला अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्यामुळेच नांदेड जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यात १ लाख १२ हजार २०३ शौचालय बांधण्यात आली आहेत. दुस-या क्रमांकावर बीड जिल्हा असून या जिल्ह्याने १ लाख ११ हजार ८२० शौचालय बांधले आहेत. तर सोलापूर जिल्ह्याने १ लाख १० हजार ६३६ शौचालय बांधले आहेत. औरंगाबाद विभागातील इतर जिल्ह्यांतून बांधलेले शौचालय- उस्मानाबाद जिल्हा- ८२ हजार ५८५, औरंगाबाद- ७९ हजार ५९, जालना- ७५ हजार ८४८ (हागणदारीमुक्त), हिंगोली- ४२ हजार ७२२, लातूर- ३५ हजार ५६० तर परभणी जिल्ह्यातून ३१ हजार ७२२ शौचालय बांधण्यात आलेली आहेत.
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दौ-यादरम्यान मला स्वच्छतेची निकड लक्षात आली , त्यानंतर जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी- कर्मचारी यांच्या बैठका घेऊन नियोजन केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. या मोहिमेला चळवळीचे स्वरूप देण्यासाठी ५० पर्यंत शौचालय बांधकाम करावयाच्या १८१ गावांमधून मिशन १८१, त्यानंतर फास्ट ट्रॅक ७५, मोठ्या गावांसाठी १३० ग्रामपंचायतींमधून मिशन दस अश्वमेध, चालू वर्षात एकही शौचालय बांधकाम न केलेल्या ८८ ग्रामपंचायतीसाठी फोर्स फिनिक्स, फास्ट ट्रॅक १०० हे उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. गुरुवारपासून ५० टक्के शौचालयाचे उद्दिष्ट असलेल्या २१२ ग्रामपंचायतींसाठी ‘मिशन लक्षवेध’ हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. पायाभूत सर्वेक्षणानुसार आता नांदेड जिल्ह्यात केवळ ९० हजार शौचालयांचे बांधकाम करणे शिल्लक असून येत्या डिसेंबरअखेर जिल्हा पाणंदमुक्त करण्याचा संकल्प केल्याची माहितीही मुख्य कार्यकारी अधिकारी शिनगारे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात पाच तालुके हागणदारी मुक्त
मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी शौचालय बांधकामासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळेच आत्तापर्यंत जिल्ह्यातील ५ तालुके हागणदारीमुक्त झाली आहेत. यात अधार्पूर, मुदखेड, धमार्बाद, माहूर आणि नांदेड या तालुक्यांचा समावेश आहे. या महिन्याअखेर जिल्ह्यातील हिमायतनगर, भोकर, हदगाव आणि उमरी हे तालुके हागणदारीमुक्त करण्यात येणार आहेत.
शौचालय बांधकाम करण्याच्या देशव्यापी स्वच्छ भारत मिशन उपक्रमाला नांदेड जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले आहे. विशेषत: जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील नागरिक यांचे मोठे सहकार्य मिळाले आहे. यामुळेच नांदेड जिल्हा शौचालय बांधकामात राज्यात अव्वल ठरला आहे.