जातीनिहाय जनगणना, आरक्षणासह इतर मागण्यांसाठी भोकरमध्ये ओबीसी एकवटला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 05:12 PM2022-12-15T17:12:58+5:302022-12-15T17:13:45+5:30
सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून, अराजकीय लढा निर्माण झाला तरच ओबीसींचे आरक्षण मिळणार
भोकर : ओबीसींना राजकीय आरक्षण, ओबीसी जणगणना यासह विविध सामाजिक समस्यांसाठी भोकर येथे ओबीसी प्रवर्गातील बांधव आज ओबीसी सन्मान सोहळ्यानिमित्त एकवटले होते. तत्पूर्वी प्रमुख रस्त्याने निघालेल्या दुचाकी रॅली मधून शक्ती प्रदर्शन करीत, मी ओबीसी या घोषणेने शहर दणाणले होते.
शहरातून निघालेली रॅली तहसील कार्यालय येथे पोहोचली. यावेळी नायब तहसीलदार रेखा चामनार यांच्याकडे ओबीसी समन्वय समितीतर्फे न्याय हक्कांच्या मागण्यांचे निवेदन दिले. तालुका ओबीसी समन्वय समितीच्या वतीने आयोजित शहरातील ओम लाॅन्स येथे नरसारेड्डी गोपीलवाड यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी सन्मान मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मणराव हाके यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी लक्ष्मणराव हाके म्हणाले की, इंग्रजांनी १८७१ ते १९३१ पर्यंत देशात जातीनिहाय जनगणना केली. स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली तरी जात गणना झाली नाही. देशात विविध प्रकारची क्रांती झाली परंतु सामाजिक न्यायाची क्रांती झाली नाही. मंडल आयोगाला लोकसभा आणि विधानसभेत ओबीसींना आरक्षण द्यायचे होते. मात्र, तसे अद्याप झाले नाही. बिहारमध्ये जात गणना होते. पण, महाराष्ट्रात होऊ शकत नाही. महाराष्ट्राकडे इंपेरिकल डाटा गोळा करायला पैसा मिळत नाही असा घणाघाती आरोप करुन, गरीबी संपली म्हणजे विकास नाही तर, सामाजिक समता प्रस्थापित झालीतरच विकास होईल असे त्यांनी ठणकावून सांगितले.
अजस्त्र हत्तीचं बळ ओबीसींमध्ये आहे. न्याय हक्कासाठी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून, अराजकीय लढा निर्माण झाला तरच ओबीसींचे आरक्षण मिळणार आहे, असे सांगून संघटीत लढा देण्याचे आवाहन हाके यांनी केले. प्रास्ताविक नामदेव आयलवाड यांनी केले. सुत्रसंचालन अंबादास आटपलवार यांनी केले. या मेळाव्याच्या निमित्ताने तालुक्यातील ओबीसी बांधव हजारोंच्या संख्येने प्रथमच एकवटल्याचे चित्र पहावयास मिळाले.