कॉफीच्या नावाखाली तरुणाईचे अश्लील चाळे; कॅफेत आढळल्या अंधाऱ्या खोल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 05:11 PM2021-10-09T17:11:22+5:302021-10-09T17:13:15+5:30
कॉफी शॉपवरील अंधाऱ्या खोलीमध्ये तरुण आणि तरुणी अश्लील चाळे करीत आहेत.
नांदेड : शहरातील कॉफी शॉपमध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे ( obscene activity in Coffee Shop ) सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आता अशा कॉफी शॉपवर धाडी ( Raid on Coffee Shops ) टाकण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी मुसलमानवाडी पाटीजवळ असलेल्या लव्ह बर्ड कॉफी शॉपवर धाड मारुन तरुण-तरुणीला पकडण्यात आले. या प्रकरणात कॉफी शॉपच्या चालकावर कारवाई करण्यात आली.
शहरात कॉफी शॉपचा सुळसुळाट झाला आहे. या कॉफी शॉपवरील अंधाऱ्या खोलीमध्ये तरुण आणि तरुणी अश्लील चाळे करीत आहेत. एका तासासाठी जवळपास दोनशे ते चारशे रुपयापर्यंत शुल्क त्यासाठी आकारण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कॉफी शॉपमध्ये चहा किंवा कॉफीचे कुठलेही साहित्य नाही. गुरुवारी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आनंद नगर भागात असलेल्या दोन कॉफी शॉपवर धाड टाकण्यात आली होती. यावेळी आठ तरुण आणि सहा तरुणींना पकडण्यात आले.
यावेळी कॉफी शॉपमध्ये स्टोव्ह आणि दोन कप एवढेच साहित्य आढळून आले. त्यानंतर शुक्रवारी नांदेड ग्रामीण पोलीस आणि इतवारा उपविभागाच्या दामिनी पथकाने संयुक्तपणे लव्ह बर्ड या कॉफी शॉपवर धाड टाकली. त्यात एक तरुण आणि एक तरुणी अश्लील चाळे करताना आढळले. यावेळी सुनील मुकिंदराव बेरुळकर या चालकाला पकडले. या कारवाईत सपोनि संकेत दिघे, दामिनी पथकाच्या पोउपनि पी.आर.बाभळे, उज्ज्वला दिग्रसे, राजेश माने यांचा समावेश होता.