कापूस खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:19 AM2020-12-06T04:19:10+5:302020-12-06T04:19:10+5:30
भोकर - येथील मनजित कॉटन प्रा. लि. या जिनिंगमध्ये शासनाचे कापूस खरेदी केंद्र असून, येथे येणाऱ्या कापूस उत्पादक ...
भोकर - येथील मनजित कॉटन प्रा. लि. या जिनिंगमध्ये शासनाचे कापूस खरेदी केंद्र असून, येथे येणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना डावलून कापूस व्यापाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याच्या प्रकाराबद्दल शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
मनजित कॉटन मिल येथे शासनाचे खरेदी केंद्र सुरू होण्याअगोदर किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट करण्यात आली. शासनाचा हमीभाव ५८२५ असताना शेतकऱ्यांकडून ४७०० ते ५३०० या कमी भावात खरेदी करण्यात आला. याच ठिकाणी खाजगी शेतकरी बाजार समिती स्थापन असून, त्यात शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. खाजगी बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करता येत नाही, तरीही येथे खाजगी शेतकरी बाजार स्थापन करून त्या ठिकाणी कुठलाही व्यवहार केला जात नाही. गेल्या पाच वर्षांपासून तिथे नावाला पाटी लावण्यात आली. मनजित कॉटन मात्र त्याठिकाणी कुठलाही व्यापार, व्यवहार, मालाचा लिलाव, करीत नाही. केवळ शासनाची दिशाभूल करण्यासाठी उद्योग केला जात आहे, तसेच मनजित कॉटन प्रा. लि. या जिनिंगमध्ये शासनाचे कापूस खरेदी केंद्रसुद्धा सुरू झाले आहे. शेतकऱ्याचा सातबारा घेऊन व्यापारीच गाडी आणून तिथे लावतात. त्या व्यापाऱ्यांच्या गाडीला प्रथम प्राधान्य आणि चांगल्या दर्जाचा भावदेखील दिला जातो; परंतु शेतकरी कापसाची गाडी घेऊन आल्यावर त्यांना दुय्यम वागणूक देऊन कमी भाव दिला जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कापूस येथे येतो कसा, त्याची सातबारा नोंद कशी होते. ज्यांच्या नावे कापूस विक्री दाखविण्यात येते त्याने किती लागवड केली होती, आदी बाबी तपासून पाहणे आवश्यक आहे. प्रशासनाने व सहकार विभागाने येथील कारभाराची चौकशी करावी.