चैत्र नवरात्र महोत्सवानिमित्त पहिली माळ अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 01:01 AM2019-04-07T01:01:37+5:302019-04-07T01:03:18+5:30
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक व मूळ पीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूरगडावरील श्री रेणुकामाता मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच ६ एप्रिल रोजी पहिली माळ अर्पण करण्यात आली.
श्रीक्षेत्र माहूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक व मूळ पीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूरगडावरील श्री रेणुकामाता मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच ६ एप्रिल रोजी पहिली माळ अर्पण करण्यात आली.
६ एप्रिल रोजी ध्वजारोहण केल्यानंतर गुढी उभारून गुढीचे पूजन करून पिवळे वस्त्र अर्पण करत मातेची अलंकार महापूजा करुन घटस्थापना करण्यात आली. यावेळी लातूरचे मुख्य न्यायाधीश जोशी यांच्या हस्ते तसेच पुष्पपूजनाने या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यानंतर भाविकांना पूरणपोळी तुपाचा महाप्रसाद देण्यात आला. महापूजा विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी, विनायकराव फांदाडे यांनी पार पाडली.
या महोत्सवादरम्यान संस्थानने ६ ते १४ एप्रिल या कालावधीत भविकांसाठी दररोज महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. १० एप्रिल रोजी रात्री ७ ते १० वाजता प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
६ एप्रिल रोजी सकाळी ६ ते १० या वेळेत पहिली माळ अर्पण करताना स्वरभास्कर नितीनजी पंडित धुमाळ यांच्या सनईवादन कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली तर रात्री ७ ते १० वाजेपर्यंत गायक पंडित संजय जोशी यांचा गायनाचा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी व संजय काण्णव यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते़ मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती़
१० एप्रिल रोजी पंचमीनिमित्त मातेला अलंकार महापूजा, फलपूजन व द्राक्षाची आरास घालण्यात येणार असून १२ एप्रिल रोजी कुमारिका पूजन, अलंकार महापूजा,महाआरती, छबिना,१३ एप्रिल रोजी अलंकार महापूजा व चंडीयागास प्रारंभ, पूर्णाहुती १४ एप्रिल रोजी अलंकार महापूजेने या नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.